ऑनलाईन टीम / सातारा :
नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने आत्महत्येचा इशारा देणारे पोलीस कर्मचारी माळी हे आज दुपारी यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत सापडले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. माळी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
साताऱ्याहून म्हसवड पोलीस ठाण्यात बदली होत असल्याने पोलीस कर्मचारी माळी यांनी आज सकाळीच व्हिडिओच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला होता. वैद्यकीय आणि घरगुती कारणांमुळे माळी यांना म्हसवड येथे बदली नको होती. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याशीही चर्चा केली. मात्र, त्यांची मागणी अमान्य झाल्यामुळे माळी यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यानंतर दुपारी ते यवतेश्वर येथे बेशुद्धावस्थेत सापडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. माळी यांना सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.









