सलग तिसऱया दिवशी बेळगावला दिलासा, आणखी 146 अहवालांची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना थोपविण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतली आहे. मार्चअखेरपासून आतापर्यंत जिल्हय़ातील 6 हजार 984 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून हा सपाटा अजूनही कायम आहे. प्रशासनाला आणखी 146 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने रविवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार गेल्या दोन-अडीच महिन्यात बेळगाव जिल्हय़ातील व परराज्यातून बेळगावात आलेल्या एकूण 6 हजार 984 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 6 हजार 609 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हय़ातील 108 जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे तर 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 50 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. तर जिल्हय़ात रविवारच्या माहितीनुसार 78 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
एकूण 8 हजार 281 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 5 हजार 974 जणांनी चौदा दिवसांचे तर 2 हजार 179 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. ई-पास मिळवून वेगवेगळय़ा राज्यातून बेळगावला आलेल्यांना चौदा दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. या काळात त्यांची स्वॅब तपासणी केली जाते. अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी पाठविले जाते.
बेळगावसह कर्नाटकात आणखी दोन दिवस लॉकडाऊन
केंद्र सरकारने रविवारी मध्यरात्रीपासून आणखी दोन आठवडय़ांसाठी लॉकडाऊन वाढविले आहे. कर्नाटकातही रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी 19 मे च्या मध्यरात्रीपर्यंत आणखी दोन दिवस लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. 2 मे रोजी लॉकडाऊनसंबंधी जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीनुसार आणखी दोन दिवस वाढ करण्यात आली असून त्यानंतर कर्नाटकातील लॉकडाऊनची रूपरेषा ठरणार आहे.









