मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य : 24 तासात 96424 रुग्ण, 1174 बळी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात गेल्या 24 तासांमध्ये 96 हजार 424 नवीन रुग्ण आढळून आले असून दिवसात 1174 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या एकूण रुग्णसंख्या 52 लाख 14 हजार 678 झाली असून यातील 41 लाख 12 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 10 लाख 17 हजार 754 जणांवर उपचार सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात कोविड 19मुळे आजअखेर 84 हजार 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्यानुसार उपाय योजना आखण्यात आल्याचे सांगितले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील 5 राज्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 हजार रुग्णसंख्या आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार देशात आजअखेर 6 कोटी 15 लाख, 72 हजार 343 जणांच्या स्वॅबची तपासणी केली आहे. तर गेल्या चोवीस तासांत 10 लाख 6 हजार 615 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशात सध्या मृत्युदर 1.64 टक्के आहे. हा जगातील सर्वात कमी असून अजूनही कमी करण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. 1 टक्का मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी विविध उपाय योजना आखल्या जात असून चाचण्यांची संख्याही वाढवली आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 78 ते 79 टक्के असून हा दर वाढवण्यासाठी विविध औषध प्रणालींचा वापर केला जात आहे.









