वृत्तसंस्था / मुंबई
वाहन क्षेत्रातील जीएसटी दर तत्काळ किती व कधीपासून कपात करण्यात येणार यावर विविध बाजूंनी उद्योग क्षेत्रात चर्चा सुरु होती. यावर सद्यस्थितीत वाहन क्षेत्रात जीएसटी दर कपात करण्याची गरज नसल्याचे मारुती सुझुकी कंपनीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, व्यवसायाने चांगली तेजी पकडली आहे. तसेच दिल्लीतील कंपनीने नवरात्री ते दसरा या दहा दिवसांच्या दरम्यान प्रत्येक दिवसाला जवळपास 10 हजार कार्सची विक्री केल्याची नोंद आहे. यासोबतच ऑक्टोबरचे कार्यालयीन आकडे पुढील आठवडय़ात वाहन कंपन्यांकडून सादर होतील. तेव्हा ही बाब स्पष्ट होणार असल्याचेही म्हटले आहे.
दुसऱया तिमाहीत सुधारणा
वाहन क्षेत्राने समाधानकारक कामगिरी केल्याने दुसऱया तिमाहीत विक्रीच्या आकडय़ात सुधारणा झाल्याची माहिती आहे. मागणी कमी राहिल्याने नुकसान मोठय़ा प्रमाणात सहन करावे लागले आहे. परंतु याच दरम्यान जीएसटी कपात केली असती तर जवळपास 30 टक्क्यांनी मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले असते असा विश्वास भार्गव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.