दोन दिवसापासून दीपोत्सवाची धूम भारतात सुरू आहे. परंतु भारतात खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात महिनाभर अगोदर सुरू झाली होती. गंमत बघा, सुरुवात दिग्गज ऑस्ट्रेलिया संघापासून, आणि शेवट नवख्या नेदरलँड्स संघाविरुद्ध. मागील 25 दिवसापासून कव्हर ड्राईव्ह या सदरातून भारतीय संघाचे मी विजयी पोवाडे बरेच गायले. भारतीय संघाचे कौतुक तरी किती करावं किंबहुना कौतुकच हा शब्द आता अपुरा पडू लागलाय. मंगलाष्टक संपल्यानंतर वधू-वर जसे एकमेकांना हार घालतात आणि लग्न सोहळ्याची औपचारिकता पूर्ण करतात, नेमकी तशीच औपचारिकता काल भारतीय संघाने पूर्ण केली.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आम्हाला फार फार तर सलग चार किंवा जास्त झालं तर सलग पाच विजय म्हणण्याची सवय. पण विश्वचषक स्पर्धेसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जिथे विश्व क्रिकेटजगत तुमच्या कामगिरीकडे डोळे लावून बसलेले असते, तिथे तुमचे ओळीने नऊ विजय. लिहायला किंवा ऐकायला किंवा वाचायला अडखळल्यासारखं वाटतं ना! परंतु ही वस्तुस्थिती आहे. आज जर दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमन जिवंत असते तर ही किमया बघायला मिळाली असती.
असो. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत आज फलंदाजीचा निर्णय घेतला ते एका अर्थाने छानच झालं. भारतीय फलंदाजांना फलंदाजीचा थोडा सराव मिळाला. तर दुसरीकडे उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध जर पहिली फलंदाजी आली तर नेमकं काय करायला पाहिजे याचे आराखडे भारतीय फलंदाजांनी बांधले. आज ओळीने तीन जणांनी आपली अर्धशतके झळकवली. परंतु त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी सराव सामन्यात करतात, तशी फलंदाजी करत शतक झळकवलं.
क्रिकेटमध्ये नवखा, दुबळे हे विशेषण इतिहासजमा झालेत. अर्थात त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे 2023 ची विश्वचषक स्पर्धा. आज भारतीय फलंदाजांनी खऱ्या अर्थाने धावांची लयलूट केली. प्रत्येक धाव लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या रूपाने धावफलकावर बघायला मिळाली. विराट कोहलीने पन्नासावं शतक झळकवण्याची संधी गमावली. एका दृष्टीने झालं ते योग्यच झालं. कारण तुम्हाला क्रिकेटच्या देवाचा विक्रम मोडायचा आहे, असा विक्रम अननुभवी संघाविरुद्ध मुळीच नको. कारण पन्नासावं शतक हे तुमच्यासाठी एक माइलस्टोन आहे. आणि असं शतक जर विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत किंवा अंतिम लढतीत करता आलं तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. कदाचित परमेश्वराला ते मान्यच नसावं. जे शतक येईल ते ऐन मोक्याच्या क्षणीच. जेणेकरून सर्व क्रिकेटजगत विराट कोहलीचा हेवा करेल.
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी आपली बॅट रिफ्रेश करून घेतली. विशेषत: श्रेयस अय्यरच्या बॅटमध्ये जो व्हायरस होता, तो आज निघून गेला. आज भारतीय फलंदाजानी खऱ्या अर्थाने धावफलकाच्या समुद्रात डुबकी मारून घेतली.
असो. भारतीय संघाची कामगिरी हे निश्चितच विश्व क्रिकेटला दखल घेण्यासारखेच. आजच्या सामन्यात खऱ्या अर्थाने फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा सराव केला. एकंदरीत काय तर एकूण विश्वचषक स्पर्धेत भारताचे नऊ विजय हे नवरात्रीच्या 9 रात्री सारखेच. आता लक्ष उपांत्य फेरीकडे. त्यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करूच. तूर्तास भारतीय संघाचे अभिनंदन!









