प्रतिनिधी/सांगली
सव्वा वर्षांनी पदाधिकारी बदल न केल्याने भाजप सदस्यांमध्ये अस्वस्थता असून अंकलखोपचे नाराज जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत बुधवारी मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भाजप सदस्याला पक्षात घेवून पालकमंत्री जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला असून जत, मिरज, तासगाव तालुक्यातील आणखी काही सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील, जेष्ठ नेते एकनाथ खडसे, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आहे. पदाधिकाऱयांच्या निवडीनंतर सव्वा वर्षांनी खांदेपालट करण्याचे आश्वासन भाजपच्या कोअर कमिटीने दिले होते. मात्र विद्यमान पदाधिकाऱयांचा कालावधी मार्चमध्ये संपूनही बदलाबाबत ठोस भूमिका न घेतल्याने इच्छुक सदस्य नाराज आहेत. विद्यमान सभागृहाचा कालावधी सात-आठ महिने असल्याने बदल न झाल्यास भविष्यात संधी नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अनेक सदस्य महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत.
अंकलखोप (ता. पलूस) गटातील नितीन नवले आणि दरीबडची (ता. जत) गटातील सरदार पाटील यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. नवले यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या हालचाली होत्या. पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी नवले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी पुढाकार घेतला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा करुन दिली होती. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत धक्का दिला. ते भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखसमर्थक म्हणून ओळखले जात. परंतु दीड वर्षापासून देशमुख यांच्यासह भाजपवर नाराज होते.
दरीबडचीचे पाटीलही काँग्रेसमध्ये जाणार होते. काँग्रेस नेत्यांसोबत दोन बैठकाही झाल्या आहेत. कोरोना कमी होताच भाजपचे दोन सदस्य काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा होती, मात्र नवलेंनी बुधवारीच भाजपला खिंडार पाडले. जत तालुक्यातील अन्य तीन सदस्यांपैकी एकजण काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. मिरज तालुक्यातील भाजपमध्येही मोठया घडामोडीच्या शक्यता आहेत. संजयकाका पाटील गटाचे सदस्यही भाजपवर नाराज आहेत, त्यांच्याकडून पक्ष बदलाची पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे आणखी सहा-सात सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटेवर
जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असली तरी विद्यमान पदाधिकाऱयांना सदस्यांची एकत्र मूठ बांधता आलेली नाही. सव्वा वर्षांनी पदाधिकारी बदलाचे आश्वासन पाळले जात नसल्याच्या कारणावरुन जतमधील सरदार पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तासगाव आणि मिरज तालुक्यातील नाराज सात सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास मनपाप्रमाणे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी सत्तेवर येण्याची शक्यता आहे.