प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-कोल्हापूरमार्गे कराड रेल्वेमार्गाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. बेळगाव-कित्तूर-धारवाड या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर आता बेळगाव-कराड या रेल्वे मार्गासाठीची मागणी वाढली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंत्रिपदावर असेपर्यंत या मार्गाला अंतिम मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हावासीय करीत आहेत. यामुळे जिल्हय़ातील बेळगाव-चिकोडी या तालुक्मयांच्या विकासाला चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाला समांतर असा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभू यांनीही या मार्गासाठी इच्छा व्यक्त केली होती. बेळगाव, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे कृषिक्षेत्रासाठी ओळखले जातात. त्यामुळे कृषी क्षेत्राला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
2012 मध्ये रेल्वे विभागाने कराड-धारवाड मार्गासाठी कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, बेळगाव व कित्तूर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले होते. पुणे-बेंगळूर या राष्ट्रीय महामार्गाला लागून हा मार्ग प्रस्तावित आहे. एकूण 191 कि. मी. लांबीचा हा रेल्वेमार्ग असून, त्यापैकी 94 कि. मी. कर्नाटकातून तर उर्वरित 97 कि. मी. महाराष्ट्रातून जातो. या रेल्वे मार्गामुळे बेळगाव, धारवाड व कोल्हापूर या तीन जिल्हय़ांच्या उद्योगाला फायदा होणार आहे. सध्या असणारा मार्ग हा मिरजमार्गे असल्याने वेळ व अंतर वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग झाल्यास कमी वेळेत पुणे- बेळगाव हा प्रवास करता येणार आहे.
रेल्वे मंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले. यामुळे सुरेश प्रभुंच्या नंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या भागात पुन्हा एकदा रेल्वे मंत्रिपद आले. यामुळे प्रस्तावित असलेले बेळगाव-धारवाड, बेळगाव- सावंतवाडी व बेळगाव-कोल्हापूरमार्गे कराड या मार्गांसाठी जनरेटा वाढला आहे. यापैकी बेळगाव-कित्तूरमार्गे धारवाड या मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. उर्वरित दोन मार्गांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.









