क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
पणजी जिमखानाच्या बांदोडकर क्रिकेट स्टेडियमवर आता 1 नोव्हेंबरपासून क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत. मैदानावरील खेळपट्टय़ांचे आणि आऊटफिल्डचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले असून हे मैदान आता कित्येक वर्षांनंतर क्रिकेटपटूंच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याचे माहिती गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी दिली.
मंगळवारी फडके यांनी या खेळपट्टीसाठी जीसीएने नियुक्त केलेले चीफ क्युरेटर सुर्यकांत नाईक, पणजी जिमखानचे व्यवस्थापक टेरेन्स आणि जितेंद्र शहा यांच्या समवेत मैदानाची पाहणी केली. मैदानाचे आणि खेळपट्टीचे काम आता लवकरच पूर्ण होणार असून या मैदानावर वयोगटातील आणि क्लबस्तरीय सामने खेळविण्यात येणार असल्याचे विपुल फडके म्हणाले. पणजी जिमखानावर क्रिकेट अकादमीचीही निर्मिती करणात येणार असून यात क्रिकेटपटूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे लेव्हल वन अँड टू प्रशिक्षक प्रशिक्षण देणार असल्याचे फडके म्हणाले. गेल्या क्रिकेट मोसमात जीसीएच्या क्लबस्तरीय स्पर्धा कोविडमुळे झाल्या नव्हत्या. यंदा बीसीसीआयच्या परवानगीने टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा गोवा क्रिकेट संघटनेचा प्रयत्न असल्याचे विपुल फडके यावेळी म्हणाले. लवकरच बीसीसीआयचे क्युरेटर गोव्यात येणार असून ते पणजी जिमखाना मैदानाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर या मैदानावर बीसीसीआयचे सामनेही खेळविण्यात येणार असल्याचे फडके म्हणाले. पणजी जिमखानावर सध्या पाच खेळपट्टया लादण्यात आल्या आहेत. जीसीए आणि पणजी जिमखानाच्या प्रत्येकी दोन सराव खेळपट्टय़ांचेही काम आता पूर्ण झाले आहे. आता 1 नोव्हेंबरपासून या ग्रीनफिल्ड मैदानावर क्रिकेट सामने नियमितपणे खेळविण्यात येतील असे शेवटी फडके म्हणाले.









