पंतप्रधान मोदी उद्या साधणार देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद : पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. ‘परीक्षेपर चर्चा…’ या कार्यक्रमानुसार ते देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणी समजून घेणार आहेत. बेळगाव जिह्यातील दोन विद्यार्थिनींचा या संवादामध्ये समावेश झाला असून 1 एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या महामारीमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले गेले. त्यानंतर आता ऑफलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण ही महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे त्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे तणावमुक्त वातावरण तयार करणे ही काळाची गरज आहे. मुक्त वातावरणात शिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व ते पटवून देणार आहेत.
भारतात आणि परदेशात करोडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून आता संवाद साधला जाणार आहे. यापूर्वी तीन वेळा कोरोना काळात संवाद साधला गेला आहे. आता 1 एप्रिल रोजी पुन्हा हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावमधील केंद्रीय विद्यालय क्र. 3 चा विद्यार्थी श्रेयस मरगनकोप्प आणि केंद्रीय विद्यालय क्र. 1 ची विद्यार्थिनी जान्हवी देवीबेडी हिची निवड झाली आहे. या पत्रकार परिषदेवेळी केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.









