टपाल वेळेत काढण्यासाठी पोस्टाने लढविली शक्कल : पोस्ट विभागाकडून तयारी सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
टपालपेटीत टाकलेली टपाल वेळेत पोस्टमनकडून काढली जात नसल्याची वारंवार तक्रार करण्यात येत होती. यावर पोस्ट विभागाने अनोखी शक्कल लढविली आहे. यापुढे टपाल पेटींना सेन्सर बसविण्यात येणार आहे. यामुळे टपालपेटी किती वाजता उघडण्यात आली होती. याची माहिती पोस्टाच्या मुख्य कार्यालयात मिळणार आहे. टपाल वेळेत पोहोचविण्यासाठी पोस्ट खात्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात बऱयाच ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून टपालपेटय़ा बसविल्या आहेत. ज्यांना आपली पत्रे पाठवायची आहेत, ती व्यक्ती आपल्या घराजवळीत टपालपेटीत पत्र टाकत होती. संबंधित पोस्टमन टपालपेटीतील पत्र काढून ते मुख्य पोस्ट कार्यालयात घेवून जात होते. पूर्वी टपालांची संख्या अधिक असल्यामुळे दिवसातून दोन वेळा टपालपेटी उघडण्यात येत होती. परंतु आता दिवसातून एकदा टपालपेटी उघडण्यात येते.
परंतु बरेच पोस्टमन वेळेच्यावेळी जावून टपालपेटी उघडत नसल्याचे पोस्ट खात्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे यावर उपाय म्हणून टपालपेटीला सेन्सर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य पोस्ट कार्यालयातून पोस्टमन निघाल्यानंतर किती वेळात टपालपेटीच्या जागी पोहचून टपाल घेवून कार्यालयात येतो, याची नोंद सेन्सरमुळे ठेवण्यात येणार आहे.
बेळगावमध्ये लावण्यात येणार सेन्सर
बेळगाव शहर व उपनगरांत 28 टपालपेटय़ा आहेत. याशिवाय पोस्ट कार्यालयांमध्येही टपालपेटय़ा आहेत. शहरात असणारे 30 पोस्टमन हे त्या त्या विभागातील टपालपेटय़ांमधील टपाल गोळा करण्याचे काम करतात. बेळगाव विभागात सेन्सर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पोस्ट विभागाकडून तयारी सुरू आहे. यामुळे टपालपेटीतील टपाल लवकर पोहोचण्यास मदत होणार आहे.









