कोविड हॉस्पिटलच्या नर्सेसना आत्मविश्वास
महेश कोनेकर / मडगाव
गोव्यात कोरोना व्हायरसचे सात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. या रूग्णांवर डॉ. एडविन गोम्स यांच्या बरोबर मडगावच्या ईएसआय (कोविड-19) हॉस्पिटलच्या नर्सेसने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. या सात रूग्णांवर उपचार करताना बराच अनुभव मिळाला, त्याच्या बळावर आत्ता गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले तरी त्यांच्यावर उपचार करण्यापर्यंत या हॉस्पिटलच्या नर्सेसचे मनोबल वाढले आहे.
केवळ कामगारवर्गासाठी असलेले मडगावचे ईएसआय हॉस्पिटल एका रात्रीत ‘कोविंड-19’चे हॉस्पिटल बनले. या ठिकाणी काम करणाऱया सफाई कामगार, इतर कर्मचारी, नर्सेस तसेच डॉक्टर यांच्यासाठी हा नवा अनुभव तसेच एक आव्हान होते. सरकारने जेव्हा मडगावातील ईएसआय हॉस्पिटलचे रूपांतर गोव्यातील कोविड-19 हॉस्पिटलमध्ये केले, तेव्हा येथील काही कर्मचारी रेजेवर होते, त्यांना रजा रद्द करून डय़ुटीवर रूजू होण्याचा आदेश देण्यात आला. तेव्हाच अनेकांना एकूण परिस्थितीचा अंदाज आला होता.
सरकारने गोमेकॉच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. एडविन गोम्स यांच्यावर कोविड-19 हॉस्पिटलची जबाबदारी देताना त्यांना नोडल ऑफिसर बनविले. या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह पहिला रूग्ण आला तो रात्रीच्यावेळी. त्याच्यावर उपचार करण्याचे एक आव्हान डॉ. एडविन गोम्स यांच्यासमोर होते तसेच आव्हान येथील नर्सेससमोर होते.
सर्वच कर्मचारी होते मानसिक तणावाखाली
कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांवर उपचार कसे करावे याचा कोणताच अनुभव किंवा प्रशिक्षण नसताना थेट नर्सेसना रूग्णांवर उपचार करावे लागले. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्याचे वृत्त दररोज वृत्तपत्रे, टीव्ही तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांतून पुढे येत होते. त्यामुळे येथील सर्वच कर्मचारी हे मानसिक तणावाखाली होते. त्याला नर्सेससुद्धा अपवाद नव्हत्या. सर्वजण मानसिक तणावाखालीच काम करत होते.
दररोज उपचारासंदर्भात मार्गदर्शन
कोविड-19 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या सातही कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची प्रकृती तशी ठिक होती. एकही रूग्ण गंभीररित्या आजारी नव्हता. तरीसुद्धा कोरोना व्हायरस हा खतरनाक रोग असल्याने, तसेच तो साथीचा रोग असल्याने या रूग्णांवर उपचार करणाऱया नर्सेसना दररोज उपचारासंदर्भात ‘ऑरीएन्टेशन व ब्रीफिंग’ केले जायचे. त्यातून उपचार कसे करावे याचे ज्ञान मिळाले तसेच त्यामुळे मनोबल वाढण्यात मदत झाल्याची माहिती नर्सेसनी दिली.
वेळीच उपचार झाल्याने रुग्णांमध्ये सुधारणा
सुरवातीला जेव्हा पहिला रूग्ण आला, तेव्हा हॉस्पिटलात सुरक्षा किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे सर्वजण घाबरले होते. नंतर सुरक्षा किट आले व मनातली भीती काही प्रमाणात दूर झाली. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ‘श्वसन संक्रमणा’चा त्रास होत असतो. पण, या सातही रूग्णांना असा त्रास नव्हता. या सातही रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान वेळीच झाल्याने, त्यांच्यावर उपचारसुद्धा वेळीच झाले. वैद्यकीय उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला व त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.
हे सर्व रूग्ण सुखरूप घरी जाणे जसे डॉक्टरांसाठी महत्वाचे होते तसेच नर्सेसना देखील होते. या सात रूग्णांवर उपचार करताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार कसे करावे याचे मूलभूत ज्ञान नर्सेसना मिळाले, त्यामुळे आगामी काळात असे रूग्ण आढळून आले तर आता अशा रूग्णांवर उपचार करण्याची तयारी येथील नर्सेसची आहे.
नर्सेस, डॉक्टरना कुटुंबियांपासून रहावे लागले दूर…
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार करणाऱया नर्सेसना व डॉक्टरांना घरी जाऊ दिले नव्हते. त्यांना सात दिवस हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना फॅमिलीपासून दूर रहावे लागले. आता सर्वजण आपल्या घरी जाऊन पूर्वीप्रमाणे डय़ुटीवर येत असतात. 14 दिवसांनंतर सर्व नर्सेसची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.









