ऑनलाईन टीम/तरुण भारत
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांचं नवं प्रचारगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांमध्ये खेला होबे अशी घोषणा देत भाजपाला चितपट केलं होतं. त्याच धर्तीवर आता अखिलेश यादवही ‘खेला होबे’चं आव्हान भाजपाला देत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. समाजवादी पार्टीने शुक्रवारी आपलं नवं प्रचारगीत प्रसिद्ध केलं आहे. ‘खेला होबे’च्याच धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या गीताचे ‘बोल मुंह के बल बीजेपी गिरिहे, खदेंडा होईबे’ असे आहेत. सोशल मीडियावर सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होतय.
यावर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ‘खेला होबे’ या घोषणेची चांगलीच चर्चा झाली होती. ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे’चा नारा देत पुन्हा एकदा पश्चिम बंगालवर सत्ता काबीज केली. आता ममता यांच्यानंतर समाजवादी पार्टीने प्रसिद्ध केलेल्या या गाण्याच्या माध्यमातूनही अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशातल्या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच आगामी निवडणुकांमध्ये भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचा दावाही केला आहे. गाण्यात असं म्हटलं आहे की जर समाजवादी पार्टीचं सरकार पुन्हा आलं तर उत्तरप्रदेशात आनंदी आनंद होईल. या गाण्यात अगदी शिताफीने ‘मेला होईबे’, ‘खदेडा होईबे’, ‘खेला होईबे’ अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या गाण्यात अवधि आणि भोजपुरी शब्दांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे.