- ‘डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कारां’चे वितरण
ऑनलाईन टीम / पुणे :
नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या अतिदुर्गम भागात रुग्णालयाची उभारणी करणारे आणि अनेक सामाजिक कामे करणारे डाॅ. अशोक बेलखोडे आणि स्वतःवर ओढावलेल्या संकटांचा स्विकार करत त्याचे संधीत रुपांतर करणारे बहुविकलांग टिंकेश काैशिक या दोघांचा संघर्ष आणि मुल्यांचा रोमांचकारी प्रवास उलगडला. अतिउच्च कसोटीच्या क्षणांना सामोरे जातांना सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या धडधाकट व्यक्तिंनी पुन्हा एकदा आत्मचिंतन करावे, असाच हा संघर्ष होता.
डाॅ.अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणा-या डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कारांचे नुकतेच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रत्येकी रूपये वीस हजार आणि स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डाॅ. अशोक बेलखोडे आणि टिंकेश काैशिक यांना यंदाचा डाॅ.अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी पुरस्कारर्थींशी संवाद साधत त्यांचा संघर्षमय जीवनपट उलडगडला.
डाॅ. अशोक बेलखोडे त्यांच्या खडतर प्रवासाबाबत प्रकट मुलाखतीत म्हणाले की, साने गुरुजी, बाबा आमटे, अनिलबाबा अवचट यांसारख्या कृतीशिल व्यक्तींची वस्तुनिष्ठ उदाहरणे समोर होती. शालेय जीवनात अभ्यासात थोडा ठिकठाक होतो. नागपूरच्या मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर गांभिर्याने अभ्यास करुन सर्जन झालो. घरात सेवा आणि भक्तिभावाचे वातावरण होते, त्यामुळे तो संस्कार रुजला होताच. गाडगे महाराज आमच्या घरी येत असत. त्यांच्या कीर्तनामध्ये माझे वडिल त्यांना पेटीची साथ संगत करीत असत. पुढे ‘हॅलो’ या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात निश्चित केले. ‘हॅलो’मुळे ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली. ‘हॅलो’चेच बोट धरून मी सामाजिक कार्यात ओढला गेलो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
टिंकेश कौशिक म्हणाले की, प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष येतो. आज मला मिळालेल्या या पुरस्कारामुळे माझ्या संघर्षाला चेहरा मिळाला आहे. वयाच्या नवव्या वर्षी विजेचा शॉक लागल्याने मला हे अपंगत्व आले. परंतु, या अपघातानंतर खचून न जाता त्याचा स्वीकार केल्यामुळे संघर्षाची धार कमी झाली. मी आजही माझ्यातील क्षमता बोलून, पटवून सांगण्यापेक्षा कृतीतून सिद्ध करण्यावर अधिक भर देतो. आयुष्यातील कसोटीचे अनेक क्षण पार करून मी पुढे आलो आहे आणि ॲडव्हेंचर स्पोर्टसमध्ये नाव कमावणे हे माझे ध्येय आहे.








