फॉर यॉर आइज ओन्लीमध्ये मुख्य भूमिकेत
लोकप्रिय वेबसीरिज ‘स्कॅम 1992’मधील अभिनेता प्रतीक गांधीने एका नव्या वेबसीरिजचा प्रस्ताव स्वीकारला आहे. प्रतीक ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या एका बिग-स्केल वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या वेबसीरिजचे शीर्षक ‘फॉर यॉर आइज ओन्ली’ असणार आहे. यात प्रतीक एका गुप्तचर अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे.
सुमित पुरोहित या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. तर बॉम्बे फेबल्स मोशन पिक्चर्सकडून या सीरिजची निर्मिती केली जात आहे. याची कथा 70 च्या दशकावर बेतलेली असून ही सीरिज 3 देशांमध्ये चित्रित केली जाणार आहे. सीरिजचे चित्रिकरण जून महिन्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
प्रतीक गांधीची द ग्रेट इंडियन मर्डर ही वेबसीरिज चालू आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. यात रिचा चड्ढा देखील दिसून येणार आहे. या सीरिजची निर्मिती अजय देवगणने केली असून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ती स्ट्रीम होणार आहे. ओटीटीवर गाजणारा प्रतीक आता मुख्य चेहरा ठरला आहे.









