पोलिसांना सूचना दिल्याची गृहमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
आजपासून (सोमवार) राज्यात दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊन जारी झाला असून अनावश्यकपणे रस्त्यावर फिरणाऱयांची गय केली जाणार नाही. आजपासून आणखी कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे, असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांची वाहने जप्त केली जात आहेत. ग्रामीण भागातही लॉकडाऊन परिणामकारकपणे जारी केला जात आहे. शहरी भागातच नियमांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे अधिक आहेत. त्यामुळे आखणी कठोर कारवाई अनिवार्य आहे. दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊन काळात आणखी कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
विविध जिल्हय़ांमध्ये जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेला 3-4 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी झाला आहे. बाजारपेठ असलेल्या भागात गर्दीवर नियंत्रण आणणे कठीण आहे. 50 वर्षांवरील पोलिसांना पाळीच्या आधारे कामावर नेमून त्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीची बेकायेशीर विक्री करण्याऱयांवर कठोर कारवाई करण्यात येईल. रेमडेसिवीरचा काळाबाजारही रोखण्यात आला आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीची कमतरता आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिसांच्या कुटुंबीयांचेही लसीकरण
राज्यातील 95 टक्के पोलिसांचे लसीकरण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दुसऱया टप्प्यात पोलिसांच्या कुटुंबीयांनाही लस देण्यात येईल. केवळ पोलिसच नव्हे; तर त्यांचे कुटुंबीयही कोरोना योद्धे आहेत. त्यामुळे त्यांनाही लस देणे अत्यावश्यक आहे .अलिकडेच पोलीस महासंचालकांना यासंबंधी सूचना दिल्या आहेत, असे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.









