उत्तर प्रदेशातील बहराई शहराच्या बक्षीपुरा वसतीत एक अनोखा विवाह पार पडणार आहे. या विवाहात हिंदू परंपरांचे पूर्णतः पालन केले जाणार आहे. तथापि काही महत्त्वाची परिवर्तनेही करण्यात येणार आहेत. विवाहात अग्नीकुंडाला सात फेऱया घातल्या जातात. तथापि या विवाहात भारत मातेची प्रतिमा ठेवून तिला सात फेऱया घातल्या जाणार आहेत. तसेच आठवे वचन म्हणून हिंदुत्त्वाच्या रक्षणाची प्रतिज्ञा वधू-वरांकडून घेतली जाईल. त्याचप्रमाणे या लग्नाच्या लग्नपत्रिकेवर कोरोनापासून संरक्षणाचा आणि कोरोनाशी संग्रामाचा संदेश ठळकपणे मुद्रित करण्यात आला आहे. लवकरच हा विवाह समारंभ होणार असून त्याची चर्चा पंचक्रोशीत मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. विवाहाला मोजकेच निमंत्रित उपस्थित राहतील.

हिंदुत्त्वाचे रक्षण तसेच कोरोनाच्या उद्रेकाशी संघर्ष हीच आपली दोन ध्येये आहेत, असे वधू-वर व त्यांचे पालक यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे विवाह साजरा करण्याची संकल्पना बक्षीपुरा येथील नागरिक आणि अलीगड येथे मार्केटिंग इनिस्पेक्टर म्हणून काम पाहणारे सुरेंद्रसिंग यांची आहे. त्यांनी आपल्या पुत्राच्या विवाहात ही संकल्पना आचरण्यात आणण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे सर्व सज्जता केली. लग्न पत्रिकेवर कोरोनांच्या नियमांचा उल्लेख असून मास्क कसा उपयोगात आणावा यासंबंधीही महत्त्वपूर्ण सूचना आहे.









