- विद्यार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा
- कोरानाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय
- सर्व शाळांना परिपत्रक, ई-मेलद्वारे माहिती
- कपातीबाबत अभ्यासक्रम मंडळाकडून सखोल अभ्यास
- वगळलेल्या अभ्यासक्रमाची शाळांना दिली माहिती
- भाषा, कुशलता विषयांमध्ये कोणतीही कपात नाही
- निर्णयामुळे विद्यार्थी, शिक्षक, शाळांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या संक्रमणामुळे 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून स्टेट कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ऍण्ड ट्रेनिंगतर्फे (एससीईआरटी) तशा आशयाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शिक्षण खात्याने त्यास मान्यता दिली असून सर्व शाळांना ते परिपत्रक पाठवण्यात आले आहे.
एससीईआरटीचे अध्यक्ष नागराज होन्नेकरी यांनी ही माहिती देऊन सांगितले की, कपात झालेला अभ्यासक्रम शिकवण्यात येणार नाही आणि तो परीक्षेत असणार नाही. बोर्ड ऑफ स्टडीजने या संदर्भात विचारविनिमय करुन आणि तपशीलवार पडताळणी करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.
भाषा, कुशलता विषयांमध्ये कपात नाही
भाषा आणि कुशलता (स्कील विषय) यात मात्र कपात करण्यात आलेली नाही. प्रत्येक विषयातील कोणता अभ्यासक्रम 30 टक्के कापायचा याचा तपशील सर्व शाळांना परिपत्रकातून ई-मेल द्वारे पाठवण्यात आला असून शाळांच्या प्रमुखांनी मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी त्याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे निर्देश परिपत्रकातून देण्यात आले आहेत.
अभ्यासक्रम कपातीची माहिती दिली शाळांना
मागील जुलै महिन्यात गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) कोरोनाचे संकट ओळखून नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमातील विषयावर कपातीची माहिती एकूण 60 भागात विभागण्यात आली असून ती सर्व शाळांना ई-मेल मधून पाठवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे शाळांना अर्थात शिक्षक-पालक इत्यादींना दिलासा मिळाला आहे.

शाळा सुरु करण्यासंर्भात चर्चा सुरु
दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात सरकार व शिक्षण खाते संबंधित मुख्याध्यापक पालक – शिक्षक तसेच इतरांशी चर्चा करीत असून त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय अजून झालेला नाही, असेही होन्नेकरी यांनी नमूद केले. दहावी – बारावीचे वर्ग कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरु करण्यास मान्यात देण्यात आली आहे. काही शाळांनी तसे वर्ग चालू केले आहेत. परंतु विरोधामुळे बहुतेक शाळांनी त्याची कार्यवाही अद्याप केलेली नाही. जून 2020 पासून सलग 5 महिने आता ऑक्टोबरपर्यंत शाळा बंदच असून कोरोनाचे संकट पूर्णपणे निवळले नसल्यामुळे शाळा केव्हा सुरु होणार याची अद्याप शाश्वती नाही.
कोरोनामुळे पाच महिने शाळा बंदच
गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत शाळा बंदच आहेत. त्या सुरु करण्यास पालकांचा अजूनही विरोध होत असून त्याचा परिणाम म्हणून शाळा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, 30 टक्के अभ्यासक्रम कापला तरी शाळा कधी सुरु होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
शालेय मुले गेल्या 5 महिन्यांपासून शाळेत जाऊ शकलेली नाहीत. अनेक पालकांना त्यांना शाळेत पोहोचवणे व शाळेतून आणण्याची कसरत इतकी वर्षे करावी लागली होती परंतु यंदा मात्र पालकांची आतापर्यंत तरी त्यातून सुटका झाली आहे. पावसाळ्य़ात शाळेत जाता-येताना मुलांची देखील गैरसोय आणि अडचण होत होती. त्यातून यंदा मुले सुटली आहेत. मागील शैक्षणिक वर्षात मार्च-एप्रिलमध्ये कोरोनामुळे मुलांच्या परीक्षाही होऊ शकल्या नसल्याने त्यांना सर्वांना पुढील वर्गात प्रवेश देऊन शिक्षण खात्याने ते वर्ष संपवले. आता यंदाही चालू शैक्षणिक वर्षात तेच करावे लागणार की काय अशी चिन्हे दिसत आहेत.
‘कपात झालेला अभ्यासक्रम शिकवण्यात येणार नाही आणि तो परीक्षेतही असणार नाही. बोर्ड ऑफ स्टडीजने या संदर्भात विचारविनिमय करुन आणि तपशीलवार पडताळणी करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.’
– नागराज होन्नेकरी, एससीईआरटीचे अध्यक्ष
सहामाही सत्र परीक्षा होणार की नाही?
शाळांच्या नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या प्रथम सप्ताहात प्रथम सत्र (सहामाही) परीक्षा होणार होत्या परंतु आता ते शक्य नाही. त्यामळे सदर परीक्षा आता होणार नसल्याचेच दिसून येत आहे. अनेक शाळांमधून सध्या ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिकवण्याचे काम चालू असून त्यास मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र काही तालुक्यांमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने मुलांची खूप तारांबळ उडत आहे.









