वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ही तेजीच्या उसळीने झाली आहे. सोमवारी पहिल्याच सत्रात जगतिक शेअर बाजारांच्या मजबुतीचा फायदा मुंबई शेअर बाजाराने उठवला असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. यामध्ये सेन्सेक्सने 900 अंकांपेक्षा अधिकची उंची गाठली होती. मुंबई शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे.
दिवसभरात प्रामुख्याने विविध कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी केली आहे. यामध्ये एचडीएफसी, एचडीएमसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात तेजीचे वातावरण राहिले होते. 30 प्रमुख कंपन्यांमध्ये दिवसअखेर सेन्सेक्सने 879.42 अंकांनी वधारुन निर्देशांक 33,303.52 वर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बजाराचा निफ्टी 245.85 अंकांनी वधारून निर्देशांक 9,826.15 वर बंद झाला.
मुख्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकचे समभाग सर्वाधिक 7 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच टाटा स्टील, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग वधारले होते. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा यांचे समभाग नुकसानीत राहिले होते.
मागील आठवडय़ातील शेअर बाजाराची कामगिरी सकारात्मक राहिली असून त्यामध्ये शुक्रवारी शेअर बाजारातील सेन्सेक्स 32,424.10 वर बंद झाला होता. तेजीच्या प्रवासाच्या परिणामामुळे चालू आठवडय़ातही जागतिक शेअर बाजारामुळे देशातील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. यामुळे आगामी दिवसातही शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सेन्सेक्स 879.42 तर निफ्टी 245.85 अंकांनी वधारले