आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात बुधवारी पहाटे पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आटपाडीतील शुक ओढ्यावरील पुल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली. मुसळधार पावसाने आटपाडी – दिघंची या नवीन मार्गावर साळशिंग मळा येथे पाणी आल्याने हा मार्गही पाण्याखाली गेला.
तीन दिवसापूर्वी आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी झाली. त्यातून अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले. खरसुंडी जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक यापूर्वीच बंद झाली आहे. त्यातच मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. बुधवारी पहाटेपासून या पावसाने वेग घेतला. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी दुपारी आटपाडी शहरात ग्रामपंचायत समोरील ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला.
जिल्हा प्रशासनाने पावसाबाबत सजगतेचा इशारा दिला आहे. पावसामुळे बुधवारी सकाळपासून कडकडीत बंद चा अनुभव लोकांना आला. दिघंची – हेरवाड या नवीन महामार्गावर दिघंची शाळासिंग मळा येथे रस्त्यावर तीन फूट पाणी आले आहे.
त्यामुळे अवजड वाहने वगळता अन्य वाहने या मार्गावरून जाणे कठीण बनले आहे. ठेकेदार कंपनीने रस्त्याकडेला पाणी वाहून जाण्यासाठी चर खुदाई करणे आवश्यक असताना ती केलेली नाही त्याचा फटका आटपाडी – दिघंची रस्त्याला बसला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिघंची ते लिंगीवरे हा रस्तादेखील पुलावर पाणी आल्यामुळे बंद झाला. दुपारी पावसाने जोर धरला असून तालुक्यातील अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. यापूर्वीच्या मुसळधार पावसातून सावरण्यापूर्वी पुन्हा नव्याने दमदार पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
Previous Article‘अजेय भारत’मधून वैभवशाली इतिहासाचे साक्षेपी लेखन
Next Article परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले








