आटपाडी / प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या फटक्यामुळे डाळिंब बागा उध्दवस्त झाल्याने बाजारात डाळिंबाची आवक प्रचंड घटली आहे. कठीण प्रसंगानंतरही ज्याच्या बागा शिल्लक आहेत. त्यांना उच्चांकी दर मिळत असुन बुधवारी आटपाडी बाजार समितीच्या सौदे बाजारात डाळींबाला प्रति किलो तब्बल ६२५ रूपये इतका दर मिळाला. सांगोला तालुक्यातील चोपडी येथील शेतकऱ्याच्या डाळिंबाला हा दर प्राप्त झाला.
आटपाडीतील डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाची आवक मंदावली आहे. सांगली, सोलापुर, सातारा जिल्हयातील डाळिंब येथे सौद्यासाठी येत असतात. चालु वर्ष शेतीसाठी त्रासदायक ठरल्याने डाळिंबाच्या बागांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मागणी असुनही डाळिंब उपलब्ध होत नाहीत. डाळिंबा अभावी पंढरपुर, सांगोला, अकलुज, इंदापुर येथील सौदे बाजार ठप्प आहेत. परंतु आटपाडी बाजार समितीतील सौदे बाजार मात्र सुरूच आहे.
बुधवारी बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे यांच्या आटपाडीतील मंगलमुर्ती फ्रूट सप्लायर्सच्या अडत केंद्रावर चोपडी येथील पाडुरंग गायकवाड यांच्या डाळिंबाला तब्बल ६२५ रूपये इतक्या दराची बोली लागली. तर त्यांच्याच अन्य डाळिंबाला ६०० रूपयांचा दर मिळाला. सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील नामदेव बंडगर यांच्या डाळिंबाला ४२५ रूपये इतका दर मिळाला. नाझरा येथील सिध्दनाथ सरगर यांच्या डाळिंबाला ४०० रूपये, बलवडी येथील मन्सुर शेख यांच्या डाळिंबाला ५२५ रूपये, फडतरी येथील सुरेश तबारे यांच्या डाळिंबाला १५१ रूपये दर मिळाला. डाळिंबाला विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांत ही समाधान होते.








