ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने यंदाचे विविमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात आले आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सभागृहात हजर राहू शकले नाहीत. तसेच काल सायंकाळी झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल टीका केली जात आहे. याला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया झाली आहे. मुख्यमंत्री आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवावी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आव्हाड म्हणाले, विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नाही. मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाहीय. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते विधानभवानामध्ये येतील. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? असे आव्हाड यांनी म्हटले आहे.