मुंबई \ ऑनलाईन टीम
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, आजही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. यासंबंधित पत्र त्यांनी वकिलांमार्फत ईडीला दिलं आहे. दरम्यान, या पत्रात त्यांनी ईडीच्या तपासावर आरोप देखील केले आहेत.
अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत ईडीला वकिलांमार्फत पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे.
दरम्यान, या पत्रात नवा मुद्दा आहे तो म्हणजे ३ ऑगस्टला म्हणजेच उद्या अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ईडीने देखमुख यांना याआधी तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देऊन ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे.
Previous Articleगिलगिट-बाल्टिस्तानला प्रांतीय दर्जा देण्याच्या पाकच्या हलचाली
Next Article प्राणघातक हल्ल्यात वृद्ध ठार








