मृत महिलेच्या कुटुंबाला भरावे लागले सहा लाख : मूळचे दोडामार्गचे कुटुंब
मुंबईत खासगी हॉस्टिलमध्ये रुग्णांची लूट
संतोष सावंत / सावंतवाडी:
हॉस्पिटलमध्ये फक्त व्हेंटिलेटरसाठी अवघ्या चौदा दिवसांसाठी तब्बल सहा लाख रुपये एका गरीब सर्वसामान्य कुटुंबाला मोजावे लागले. ठाणे येथे चार बाय चारच्या खोलीत राहणाऱया एका कुटुंबातील महिलेचे ‘कोरोना’मुळे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. या 14 दिवसांचे त्यांच्या मुलांना तब्बल सहा लाख रुपये बिल हॉस्पिटलला द्यावे लागले. त्यामुळे मूळचे दोडामार्ग येथील असलेले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे.
मुंबई, पुणेकर चाकरमानी आपल्या गावी येत होते, तेव्हा क्वारंटाईन मुद्यावरून गावागावात वाद विकोपाला गेले. मुंबई-पुणे या शहरात होणारा अवास्तव वैद्यकीय खर्च आणि नोकरीधंदा नसल्याने आपला गाव बरा म्हणत चाकरमानी परतले आहेत. दुसरीकडे जे मुंबईत आहेत, त्यांच्यावर ‘कोरोना’शी लढण्याचे आव्हान आहे. यात वैद्यकीय बिले लाखोंच्या घरात दिली जात असल्याने आर्थिक संकट ओढवत आहे.
‘कोरोना’ रुग्णाचे बिल लाखोत
मुंबई, ठाणे भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचे बेड कमी पडून खासगी रुग्णालयेही अपुरी पडत आहेत. कोरोना टेस्टसाठी मुंबई, गोवा, पुणे येथे दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर नातेवाईकांना मोठी आर्थिक तरतूद करूनच खासगी हॉस्पिटलच्या पायऱया चढाव्या लागत आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील एका मुंबईस्थित कुटुंबाला असाच अनुभव आला. सदर कुटुंब चार बाय चारच्या खोलीत राहते. आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व मुले असे नऊजणांचे कुटुंब आहे. वडील गॅरेजमध्ये नोकरी करत होते. एक मुलगा चालक तर दुसरा कॉन्ट्रक्टरकडे काम करतो. तुटपुंज्या पगारावर कुटुंब चालते. त्यात त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली. तिला ठाणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तिला जवळपास अडीच लाख खर्च आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तेथून तिला अन्य कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सुरुवातीला 40 हजार रुपये भरून घेण्यात आले. दोन दिवसांनी एकदा 20 ते 40 हजार असे सुमारे पावणेतीन लाख रुपये अकरा दिवस नातेवाईकांनी भरले. त्यांची आई हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर होती. तिची प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असतानाच 15 जूनला तिचे निधन झाले. हॉस्पिटलने तिचा मृतदेह मुलांना दाखविला व परस्पर अंत्यविधी केले. त्यानंतर साडेतील लाखांचे बिल हाती दिले. त्यापैकी सुरुवातीला सव्वादोन लाख भरले होते. उर्वरित सव्वालाख भरा, असा तगादा हॉस्पिटलने लावला. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना ही बाब कळताच त्यांनी या कुटुंबाला धीर दिला. त्यामुळे नातेवाईकांनी फक्त 25 हजार रुपये भरले. आणखी एक लाख रुपये द्यायचे शिल्लक आहेत. कुटुंबाने साठवलेली पुंजी आई बरी व्हावी म्हणून खर्च केली. पण ‘कोरोना’ने आईला कायमचे हिरावले. कुठलीही शस्त्रक्रिया नाही, कुठलाही औषधोपचार नाही. फक्त ऍडमिट होण्याचे आणि व्हेंटिलेटरचे सहा लाख रुपये बिल द्यावे लागले.
‘कोरोना’ रुग्णांना खासगी रुग्णालयात येणाऱया भरमसाठ खर्चामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे. कोरोनाने अनेकांचे व्यवसाय बुडाले. नोकऱया गेल्या. अनेकांनी मृत्यूला जवळ केले. मात्र, अशा स्थितीचा खासगी रुग्णालये गैरफायदा घेत आहेत.
गोव्यातला रोजगारही धोक्यात
गोव्यात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ भागातील हजारो युवक-युवती नोकरीनिमित्त आहेत. मात्र, नोकरीवर जायचे तर गोव्यात टेस्टसाठी दोन हजार, क्वारंटाईनसाठी हॉटेलचा खर्च प्रत्येक दिवशी जवळपास दीड ते दोन हजार, 14 दिवसांसाठी 50 हजारच्या घरात खर्च जातोय. महिन्याचा पगार सात ते दहा हजार दिला जातो. त्यामुळे अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे.









