प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा सहकारी साखर कारखान्याचा ताबा कारखान्याच्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. कारखान्यांने थकित कर्जापोटीची 70 कोटी रुपये रक्कम भरली. त्यानंतर जिल्हा बँक संचालक मंडळास कारखान्याचा ताबा दिला. यामुळे कारखान्याला नवीन कर्ज मिळण्यासह हा हंगाम सुरू होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेने साखर कारखान्याकडून कर्ज परतफेड थकल्यामुळे आजरा साखर कारखान्याचा ताबा घेतला होता. सेक्युरिटायजेशन ऍक्ट -2002 नुसार बँकेने ही कारवाई करून 26 मे 2020 रोजी कारखान्याचा ताबा घेतला होता. थकीत कर्जापोटीची 70 कोटी रुपये कारखान्याने भरल्यामुळे सोमवारी (ता.28) झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याचा ताबा बँकेकडून कारखाना संचालक मंडळाकडे देण्याचा ठराव झाला होता.
बँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप, पत नियंत्रण व्यवस्थापन विभाग- सीएमए सेलचे फिल्ड ऑफिसर जावेद फरास, वसुली विभागाचे अधिकारी प्रवीण चौगुले यांनी पंचनामा व कागदपत्रांची पूर्तता केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, संचालक मुकुंद देसाई, मल्लिक बुरुड, अनिल फडके, जितेंद्र टोपले, दिगंबर देसाई, राजेंद्र सावंत आदी संचालकांसह प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण तसेच कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
घटनाक्रम
सकाळी साडेअकराच्या सुमाराला केडीसीसी बँकेचे अधिकारी कारखाना कार्यस्थळावर दाखल.
दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता.
दुपारी 03.30 वाजता कुलूप उघडून कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे.