प्रतिनिधी/ सातारा
गेल्या सात महिन्यापासून बंद असणारे हॉटेल-रेस्टॉरंट पुन्हा सातारकरांच्या सेवेत सुरू झाले आहेत. आज दि. 5 रोजी पहिला दिवस असून व्यवसायिक स्वच्छतेवर भर देताना दिसत आहेत. मात्र पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पुर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनलॉक ची प्रक्रिया राबवत सुरूवातीला काही अटी लागू करत हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिकांना पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली. याला हळुहळू प्रतिसाद वाढत गेला. आजपासून सशर्त डायनिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने सात महिन्यापासून बंद असलेल्या हॉटेल-रेस्टॉरंट मध्ये चैतन्य आले आहे. सकाळपासून व्यवसायिक स्वच्छतेवर भर देताना दिसत आहेत. ग्राहकांना मास्क लावणे, सॅनिटायझर देवून प्रवेश करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. तूर्तास 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. पार्सल सेवेमुळे कमी कामगार कार्यरत होते. दरम्यान, डायनिंग सेवा सुरू झाल्याने मनुष्यबळाची वाढवण्यात आले आहे. परप्रांतीय कामगार परत न बोलवता स्थानिक कामागारांना कामावर ठेवले आहे. आता रोजगाराचा प्रश्न मिटल्याने कामगारांच्यात आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाची धास्ती निर्माण झाल्याने प्रतिसाद कमी मिळत नंतर वाढत जाईल अशी आशा व्यवसायिकांना लागून राहिली आहे.