प्रतिनिधी/ पणजी
आज सोमवार दि. 21 जूनपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व इयत्तांचे नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 सुरू होत असून शिक्षक, शिक्षकेतर, प्रशासकीय कर्मचारी या सर्वांना शाळेत हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र शाळेत येण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. त्यांची जी काही शिकवणी आहे ती ऑनलाईन करावी असे निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.
एप्रिल-मे या दोन महिन्यात राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठय़ाप्रमाणात वाढल्याने व बळीची संख्या वाढल्याने शाळा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. जे काही काम असेल ते ऑनलाईन करावे असे सुचित केले होते. सुमारे 2 महिने त्यामुळे शाळा, त्यांची कार्यालये व तेथील कामकाज ठप्प होते. ते आता पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकही कोरोनामुळे संक्रमित झाले. त्यामुळे अनेक शाळा सॅनिटाईज करून बंद ठेवण्याची पाळी आली.
आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आज सोमवार 21 जूनपासून शाळा अनलॉक होत आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिन असून कोरोनाचे संकट कायम असल्याने शाळेतून योग दिनाचा कोणताही मोठा कार्यक्रम आखण्यात आलेला नाही. काही शाळांमध्ये मर्यादित स्वरूपात योग दिन निवडक लोकांसाठी साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मात्र बोलावण्यात आलेले नाही. परंतु त्यांना ऑनलाईन पद्धतीने त्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. सर्वांनी आपापल्या घरात, कामाच्या ठिकाणी सर्व ते नियम, अटी पाळून योग दिन साजरा करावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे.









