कुलगुरु प्रा. एस. ए. कोरी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक अभ्यासक्रम आपल्याला 25 टक्के ज्ञान देतो आणि जीवनाचा प्रवास आपल्याला अनुभवांतून 75 टक्के शिक्षण देते. दरवषी भारतातून 50 लाख तरुण इंजिनिअर होतात. मात्र, त्यांच्यासमोर आव्हानेही मोठी आहेत. येत्या काही वर्षांत भारत तंत्रज्ञानाच्यादृष्टीने स्वयंपूर्ण होईल. आजची पिढी अधिक कुशाग्र आहे. मात्र, त्यांनी संशोधनावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा आंध्रप्रदेशच्या सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एस. ए. कोरी यांनी व्यक्त केली.
कर्नाटक लॉ सोसायटी संचालित जीआयटीचा पदवीदान समारंभ दि. 15 रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने प्रा. कोरी बोलत होते. व्यासपीठावर व्हीटीयुचे कुलगुरू प्रा. विद्याशंकर एस., कुलसचिव प्रा. ए. एस. देशपांडे, संस्थेचे चेअरमन प्रदीप सावकार, अध्यक्ष अनंत मंडगी, कार्यकारी मंडळाचे चेअरमन राजेंद्र बेळगावकर, प्राचार्य जयंत कित्तूर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. विद्याशंकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत नेतृत्व स्वीकारले पाहिजे आणि शिकत राहिले पाहिजे. यंदाच्या वर्षापासून व्हीटीयू इंजिनिअरिंग अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगे शिक्षण घेता येणार आहे. अधिकाधिक मुली इंजिनिअर होत असून हे भारताच्या प्रगतीचे लक्षण आहे.
प्रा. ए. एस. देशपांडे यांनी जीआयटीमध्ये उत्तम शैक्षणिक वातावरण असून विद्यार्थी आणि पालकांनी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे सांगितले. कॉलेजचे माजी विद्यार्थी व अशोक आयर्न ग्रुपचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाने जगात परिवर्तन घडले असल्याचे सांगितले. प्रदीप सावकार यांनी शिक्षणामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते, असे सांगितले.









