प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी कठोर निर्बंध घातले असून मंगळवारी रात्री 9 पासून 14 दिवस कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात ‘क्लोजडाऊन’ची स्थिती असणार आहे. नागरिकांच्या अनुकूलतेसाठी सकाळी 6 ते 10 या कालावधीत जीवनावश्यक वस्तू खरेदीची मुभा देण्यात आली आहे. तर परिवहनची बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, औद्योगिक, बांधकाम आणि कृषी क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. राज्यात मागील शनिवारी आणि रविवारी ज्याप्रमाणे विकेंड कर्फ्यू लागू केला, त्याच धर्तीवर 14 दिवस कठोर निर्बंध असणार आहेत.
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात कोणत्या पद्धतीचे निर्बंध असावेत, यासंबंधी सोमवारी विधानसौधमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंगळवारी रात्रीपासून दोन आठवडे कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक लॉकडाऊन जारी करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिला आहे. यासंबंधी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी मार्गसूची जारी केली आहे. 12 मे च्या सकाळी 6 पर्यंत ही मार्गसूची जारी असणार आहे.
सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीतच जीवनावश्यक वस्तू म्हणजे भाजीपाला, फळे, दूध, मांसविक्री, पशूआहार तसेच किराणा दुकाने सुरू राहतील. हॉटेल, बार-रेस्टॉरंट, वाईन शॉप सुरू राहणार असली तरी केवळ पार्सल सेवा सुरू असणार आहे. मात्र, 10 नंतर ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. निर्बंध शिथिल केलेला कालावधी वगळता इतर वेळेत सर्व वाहनांच्या संचारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. होम डिलिवरी आणि ऑनलाईन शॉपिंग पूर्णवेळ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
मालवाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱया मालवाहू वाहनांना कोणताही अडथळा असणार नाही. नागरिकांना बाहेर फिरण्यावर प्रतिबंध आहेत. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासही करता येणार नाही. परिवहनच्या बसेस बंद असणार आहेत. पण, विमाने, रेल्वे सुरू असल्याने आरक्षित तिकीटे दाखवून नागरिकांना ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅबचा वापर करता येणार आहे. याशिवाय तातडीच्या व अत्यावश्यक परिस्थितीत खासगी प्रवासी वाहनांचा वापर करता येईल. पेट्रोल पंप, बँका, वित्तसंस्था, विमा कंपन्या सुरू असतील. शाळा-महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाची मुभा आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणारी कार्यालये वगळता उर्वरित सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांची उपस्थिती असेल. उर्वरित कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे.
औद्योगिक आस्थपने सुरू
नागरिकांच्या अनुकूलतेसाठी उत्पादन आधारित औद्योगिक आस्थापने कर्फ्यू कालावधीत सुरू राहणार आहेत. मात्र, तेथे काम करणाऱया कामगारांना ओळखपत्र दाखविणे सक्तीचे असेल. कारखाने, कंपन्यांमध्ये कोविड मार्गसूचींचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. मात्र, सामाजिक अंतर राखणे शक्य नसल्याने गार्मेंट कंपन्या सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली नाही.
आरोग्यसेवा सुरू राहणार
नागरिकांच्या अनुकूलतेसाठी अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. इस्पितळे, दवाखाने सुरू ठेवण्यास मुभा आहे. त्यामुळे मेडिकल देखील पूर्णवेळ सुरू असणार आहेत. रुग्णांना इस्पितळात नेणे किंवा तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आणण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाहीत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असल्याने लस घेण्यासाठी किंवा कोविड चाचणीसाठी घराबाहेर पडता येणार आहे.
विविध परीक्षा लांबणीवर
कोरोना नियंत्रणासाठी विकेंड कर्फ्यूप्रमाणेच कठोर नियम जारी करण्यात आल्याने परिवहनची बससेवा बंद असल्याने राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठ, दावणगेरे विद्यापीठ, व्हीटीयुच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दावणगेरे विद्यापीठाच्या बी. एड्च्या परीक्षा 27 एप्रिलपासून सुरू होणार होत्या. चन्नम्मा विद्यापीठातील एप्रिल, मे महिन्यात होणाऱया पदवी, पदव्युत्तर आणि एमबीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी आणि डिप्लोमा परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
विवाह समारंभांना परवानगी; पण…
विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली असून यापूर्वीप्रमाणेच 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा असणार आहे. मात्र, यावेळी सामाजिक अंतर, मास्कचा वापर व कोविड मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. वरात काढण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. 50 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती असल्यास राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई होणार आहे.
अंत्यविधीमध्ये केवळ 5 जणांची उपस्थिती
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे आणखी कठोर नियम जारी करण्यात आले आले. 21 एप्रिल रोजी राज्य सरकारने मार्गसूची जारी करताना अंत्यविधीमध्ये 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. आता मंगळवारपासून आणखी कठोर निर्बंध घालण्यात आले असून अंत्यविधीमध्ये केवळ 5 जणांच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. महसूल खात्याचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद यांनी रविवारीच यासंबंधीचा आदेश दिला आहे.
सरकारी कर्मचारी, मंत्री, आमदारांचे महिन्याचे वेतन कपात?
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात पुन्हा कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण राज्यात 14 दिवस बंदची स्थिती असणार आहे. कर्फ्यूमुळे आर्थिक स्थिती कोलमडणार असल्याने राज्य सरकारने पोलीस, आरोग्य खाते वगळता इतर सर्व सरकारी कर्मचारी, मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संबंधित खात्यातील कर्मचारी आणि मंत्री-आमदारांची संमती मिळाली तरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. जर एक महिन्याचे वेतन कपात झाल्यास राज्याच्या खजिन्यात 5000 कोटी रुपये जमा होतील. या रकमेतून कोविड नियंत्रणासंबंधीचा खर्च केला जाणार आहे.
काय सुरू….
किराणा दुकाने व जीवनावश्यक वस्तू खरेदी (सकाळी 6 ते 10 पर्यंतच)
हॉटेल, बार-रेस्टॉरंट, वाईन शॉपमधून पार्सलसाठी मुभा (मर्यादीत वेळेत)
उत्पादन आधारित औद्योगिक आस्थपने
कृषी व संबंधित क्षेत्र, बांधकामे व संबंधित आस्थापने
मेडिकल, इस्पितळ, दवाखाने, लॅबोरेटरिज, रक्तपेढी, होम केअर
आवश्यक मालवाहतूक
प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, इलेक्टॉनिक मिडिया
ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सी (अत्यावश्यक असताना)
बँका, एटीएम, विमा कंपन्या आणि वित्तसंस्था
रेल्वे, विमाने
सरकारी कार्यालये (50 टक्के कर्मचारी)
ऑनलाईन शिक्षण
गॅस वितरण, वीज निगमची सेवा
ऑनलाईन शॉपिंग (ई कॉमर्स)
पेट्रोल पंप
सरकारमान्य रेशन दुकाने
काय बंद…
राज्य परिवहनच्या बसेस, मेट्रो रेल्वे
नागरिकांची वर्दळ, वाहन संचार
आंतर जिल्हा, आंतरराज्य प्रवास
शाळा-महाविद्यालये
चित्रपट, मालिका, रियालिटी शोचे चित्रिकरण, चित्रपटगृहे
गार्मेंट कंपन्या
सलून, ब्युटी पार्लर, स्पा
स्विमींग पूल, स्पोर्टस् क्लब, मनोरंजन पार्क
धार्मिक, राजकीय कार्यक्रम









