ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा बंद परिणामकारक ठरू शकतो.
डावे पक्ष, संघटना, कामगार संघटना या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पीपल्स रिपब्लकिन पार्टीनेही बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापाऱ्यांनीही बंदला पाठींबा देत सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकिकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी राज्यबंदची हाक दिलेली असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षाच्या बाकावर असणाऱ्या भाजपने महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे. पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून कोणी व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप त्याला विरोध करेल, असे भाजपने म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाकडून लखीमपूर खीरी येथील घटनेचे राजकारण करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.








