प्रतिनिधी/ पणजी
28 सप्टेंबर हा दिवस जागतिक कर्णबधीर दिवस म्हणून ओळखला जातो. कर्णबधीर नक्की कोणाला म्हणायचे ज्याला जन्मापासून आवाज ऐकू येत नाही आणि आवाज ऐकू न आल्यामुळे ते मूल बोलू शकत नाही त्याला आपण कर्णबधीर म्हणू शकतो. वैद्यकीय आकडेवारीनुसार 1000 मुले जन्म घेतात तेव्हा 4 मुले कर्णबधीर असतातच. म्हणजे भारतात कितीतरी कर्णबधीर मुले रोज जन्म घेतात. मग या कर्णबधीर मुलांना योग्य ते निदान होत नाही कारण हे अपंगत्व न दिसून येणारे आहे. असे मूल शरीराने चांगले असते, परंतु त्याला काहीही ऐकू येत नाही ते बालक इतर हालचालींवर आपला आनंद व्यक्त करते, असे मत पर्वरी येथील स्वरनाद कर्णबधीर मुलांच्या पूर्व प्राथमिक शाळेचे विशेष शिक्षक गोकुळ निवंगुणे यांनी व्यक्त केले.
मुलाला जन्म घालणाऱया प्रत्येक आईने आपल्या बाळाला आवाज येतो का हे पाहिले पाहिजे. कारण जेवढय़ा लवकर मुलाचे निदान होईल तितक्मया लवकर ते मूल बोलणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा कर्णबधीर मुलांना योग्य ते श्रवणयंत्र लावून त्या मुलांना बोलण्याचे प्रशिक्षण द्यावे तेही योग्य वयातच दिले गेले पाहिजे. जन्मापासून ते 6 वर्ष वयापर्यंतच मुले ऐकण्याचे आणि बोलण्याची कला आत्मसात करतात. 6 वर्षानंतर आपण कितीही शिकवले तरी तो व्यवस्थित बोलू शकणार नाही.
मुलांना जर काहीच ऐकू येत नसेल तर त्यासाठी कॉक्लिअर इंप्लान्ट नावाची शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे मूल नॉर्मल मुलांप्रमाणे आवाज ऐकू शकते आणि बोलण्याचे प्रशिक्षण दिल्यावर नॉर्मल मुलांप्रमाणे बोलू शकते. कर्णबधिरांच्या आकडेवारी मध्ये 1000 मुलांपैकी 700 मुले पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण घेत आहेत, तर 1000 पैकी 400 मुले माध्यमिक शिक्षण घेतात. 1000 पैकी 100 मुले उच्च माध्यमिक शिक्षण घेतात. 1000 पैकी फक्त 7 मुले पदवीधर होतात. म्हणजे कर्णबधीर मुलांना किती कमी प्रमाणात शिक्षण मिळते. कारण त्यांचा पाया पक्का नसल्यामुळे ती पुढे शिकू शकत नाही त्यांना शिकवलेले समजत नाही. याला कारणीभूत आपण आहोत कारण योग्य त्या वयात अशा मुलांना शिक्षण मिळत नाही.
गोवा राज्यात नॉर्मल मुलांच्या कितीतरी पूर्व प्राथमिक शाळा आहेत. पण कर्णबधीर मुलांसाठी एकही पूर्वप्राथमिक शाळा नाही. ज्याची त्यांना अत्यंत गरज आहे. म्हणून गोव्यातील नागरिकांनी आपल्या शेजारी, नातेवाईकांमध्ये अशा प्रकारची मुले आढळून आल्यास सांगावे. जेणेकरून त्या कर्णबधीर मुलाचे इतर उर्वरित आयुष्य नॉर्मल मुलांसारखे होईल. या समाजउपयोगी कार्याला आपला नक्कीच हातभार लागेल अशी आशा व्यक्त करतो. अशी मुले आढळून आल्यास 9623701020 या नंबर वर संपर्क करावा. आपल्या सहकार्याने प्रत्येक कर्णबधीर मूल बोलते होईल, असे गोकुळ शिवंगुणे यांनी सांगितले.









