प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालत भक्तीमय वातावरणात जिल्ह्य़ात दिड, पाच, 7 दिवसांच्या गौरी-गणपतींना मनोभावे निरोप देण्यात आला होता. मंगळवारी 10 दिवसांच्या जिल्हय़ातील 36 हजार 700 खाजगी तर 48 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होणार आहे.
यावर्षी कोरोनाचा प्रभाव राहिल्याने गणेशमुर्ती आगमन व विसर्जन सोहळे साधेपणाने मात्र श्रद्धापुर्वक भक्तीमय वातावरणात होत आहेत. जिल्ह्य़ात सुमारे 1 लाख 66 हजार 660 गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यात दिड दिवसांच्या सुमारे 10 हजार, पाच दिवसांच्या 538 तर गौरी-गणपती विसर्जनादिवशी सुमारे 1 लाख 15 हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सातव्या दिवशी 262 तर आठव्या दिवशी 132 गणपतींचे विसर्जन झाले.
अनंतचतुर्दशी दिवशी जिल्हय़ातील सुमारे 36 हजार 700 गणपतींना निरोप देण्यासाठी भक्तजन सज्ज आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या विसर्जनावेळीही डामडौल न करता खबरदारी घ्यावी अशा सूचना प्रशासनस्तरावरून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात ठिकठिकाणी कृत्रीम तलावांची व्यवस्था तेथील प्रशासनाने केली आहे.









