ट्रायचे रौप्यमहोत्सवी वर्ष ः 5 जी टेस्ट बेड लाँच ः प्रकल्पासाठी 220 कोटींचा खर्च
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकारणाच्या (ट्राय) रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जी सेवेशी संबंधी 5 जी टेस्ट बेडचे लाँचिंग करण्यात आले. 220 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असणार असून आयआयटी मद्रास यांच्या नेतृत्त्वाखाली सदरचा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. मोबाईल निर्मितीमध्ये भारताचा दबदबा वाढणार असून दशकभरामध्ये 6 जी सेवा देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून 5 जी सेवेच्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. भारताला मोबाईल निर्मितीमध्ये अव्वल देश बनवायचा असून यादृष्टीने भारताची पावले भक्कम पडत आहेत. मोबाईल निर्मिती युनिटसची संख्या 2 वरून 200 वर पोहोचली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगत दशकभरामध्ये 6 जी इंटरनेट सेवा सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेला हातभार, रोजगार संधी
ते पुढे म्हणाले, 5 जी टेस्ट बेडच्या सेवेचा दूरसंचार उद्योगाला आणि स्टार्ट अप कंपन्यांना फायदा होणार आहे. 5 जीशी संबंधित उत्पादने तयार करण्यासोबत इतर गोष्टींबाबतीत उद्योजकांना आणि कंपन्यांना आपले योगदान देता येणार आहे. येणाऱया काळामध्ये 5 जी सेवेमुळे अर्थव्यवस्थेत 450 अब्ज डॉलर्सची भर पडणार आहे. या योगे प्रगती साधताना देशामध्ये नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 5 जी तंत्रज्ञानाचा शासन प्रणालित लाभ तर होणारच आहे पण या अनुषंगाने शेती, आरोग्य, शिक्षण व इतर प्रत्येक क्षेत्रालाही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्ष 2014 मध्ये भारतामध्ये 100 ग्राम पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या होत्या. परंतु आज पावणेदोन लाख ग्राम पंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरले असल्याचे ते म्हणाले.
8 संस्थांकडून एकत्रित निर्मिती
5-जी टेस्टबेटची निर्मिती ही एकूण 8 संस्थांनी एकत्रित येत विकसित केली आहे. याचे नेतृत्व आयआयटी मद्रास यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यामध्ये आयआयटी-दिल्ली, आयआयटीöहैदराबाद, आयआयटी-बॉम्बे, आयआयटी- कानपूर, आयआयएससीöबेंगळूर, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ऍण्ड रिचर्स आणि सेंटर ऑफ एक्सलेंस इन वायरलेस टेक्नॉलॉजी आदींचा समावेश आहे.









