आपण भारतीय आहोत आणि या भारतीयत्वाचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक प्रतिकांचा सन्मान देशवासीय करीत असतात. असाच काहींचा सन्मान बेळगावमधील काही देशप्रेमी व्यक्ती मागील 20 वर्षांपासून करीत आहेत. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहण करण्यासाठी ध्वज स्वच्छ धुऊन इस्त्री करून संबंधित शाळा व कार्यालयांना दिला जातो. यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नसल्यामुळे शहापूरच्या राजू यादव यांचे कौतुक केले जाते.
राजू मागील 20 वर्षांपासून शहापूर कोरे गल्ली येथे ड्राय-क्लिन व इस्त्रीचा व्यवसाय करीत आहेत. शहापूर भागात असणाऱया शाळा व कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला होणाऱया ध्वजवंदनाचा ध्वज स्वच्छ धुऊन तो इस्त्री करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पूर्वी सरकारी कार्यालयांना बिल द्यावे लागत असल्यामुळे ते पैसे आकारत होते. परंतु ही एक देशसेवा असून पैसे आकारणे त्यांना चुकीचे वाटल्यामुळे तेव्हापासून त्यांनी ही सेवा मोफत सुरू केली आहे.
तिरंगा ध्वज हे राष्ट्रीय प्रतीक असल्यामुळे तितक्मयाच सन्मानाने तो ठेवावा लागतो. राष्ट्रीय सणांपूर्वी 15 दिवस ध्वजाला स्वच्छ धुवून इस्त्री करावी लागते. ध्वज कोठेही फाटलेला नाही. याची तपासणी करूनच अधिकाऱयांकडे द्यावा लागतो. इतर कपडय़ांप्रमाणे ध्वज धुता येत नाही. कोणताही दुसरा रंग या ध्वजाला लागणार नाही याची काळजी वेळोवेळी घ्यावी लागते. बेळगावमध्ये महत्वाच्या सरकारी कार्यालयांचे ध्वज जिल्हाधिकारी कार्यालयात तपासणीसाठी आणले जातात. त्यानंतर ते संबंधीत कार्यालयांना दिले जातात. त्यामुळे व्यवस्थित स्वच्छता व इस्त्री करणे हे महत्वाचे काम असते.
तिरंग्याबरोबर इतर ध्वज सेवा
तिरंगा ध्वजाबरोबरच गल्लीत व परिसरात होणाऱया विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वापरल्या जाणाऱया भगव्या ध्वजाला इस्त्री करण्याची सेवा ते मोफत करतात.
सुशांत कुरंगी









