सुमारे 50 लाखांची हानी सहा वाहनांना आगीची झळ
प्रतिनिधी/ मडगाव
फुसलेंभाट, आकेबायश (रावणफोंड मडगाव) येथील सेरा रॉड्रिग्स यांच्या घराला शनिवारी आग लागली. आगीत सुमारे 50 ते 60 लाखांची हानी झाल्याचा अंदाज आहे. एकूण 6 वाहनांना या आगीची झळ बसून नुकसान झाले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच मडगावच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावले आणि त्यांनी दोन तास आगीशी झुंज देत ती नियंत्रणात आणली.
आग लागलेल्या घरात भरलेले एलपीजी सिलिंडर होते. जवानांनी हे सिलिंडर त्याही परिस्थितीत घरातून बाहेर काढले अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता आणि आगीची भीषणता आणखीन वाढली असती.
घराशिवाय सहा वाहनांना आगीची झळ बसली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली. एका मुलीने आपल्या आईला घरातून बाहेर काढल्यामुळे दोघीही सुरक्षित राहिल्या.
आग कशी लागली हे लगेचच कळू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे.
विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर, स्टेशन फायर अधिकारी गिल. डिसोझा, धीरज देसाई, आर. एस. खुटकर, विराज नाईक, एस.के. वेळीप, सचिन कुर्पास्कर, आर.एम. वेळीप, आर. भी. सतरकर या जवानांनी आग विझविण्यात आपले योगदान दिले.









