प्रतिनिधी/कोल्हापूर
मुंबईतील गर्भवतीला घेऊन आकुर्डे (ता. भुदरगड) येथील चालक ओटवणे (ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे आला होता. गर्भवतीला सोडून तो 15 एप्रिलला आकुर्डे गावी आला. 16 एप्रिलला त्याची तपासणी केली. त्याला इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन करण्यात आले. शनिवारी त्याला ताप, खोकल्याचा त्रास वाढला. रविवारी त्याला उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले. त्याचा स्वॅब मिरज येथे तपासणीसाठी पाठवला. मंगळवारी मध्यरात्री या चालकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् जिल्हय़ातील तो बारावा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ठरला. भुदरगड तालुक्यातील तो पहिलाच कोरोना रूग्ण ठरला आहे.
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील 54 वर्षीय व्यक्ती मुंबईत चालक आहे. तिचे स्वतःचे वाहन आहे. 15 एप्रिलला मुंबई येथील गर्भवतीला घेऊन तो ओटवणे (ता. सावंतवाडी) येथे आला. त्यानंतर तो आकुर्डे येथे गावी आला. 16 एप्रिलला पाटगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्याच्यावर इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईनचा शिक्का मारण्यात आला. त्याला गावातील प्राथमिक शाळेतील इमारतीत कोरोंटाईन केले होते. त्याच्यासोबत सांगली जिल्हय़ातील आणखी एकाला कोरोंटाईन केले आहे.
गावातच कोरोंटाईन केल्यानंतर त्याला खोकल्याचा त्रास सुरू झाला. खोकला, घसा बसल्याने, ताप वाढल्याने रविवारी, 26 रोजी त्याला उपचारार्थ सीपीआरमध्ये दाखल केले. त्याची लक्षणे पाहून स्वॅब घेण्यात आला. तो तपासणीसाठी मिरज येथील मेडीकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मध्यरात्री सीपीआर प्रशासनाला मिळाला. त्यामुळे त्याला सीपीआरमधील अतिदक्षता विभागात पहाटे दाखल करण्यात आले.
आकुर्डेतील चालकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील हा पहिलाच कोरोना रूग्ण आहे. चालकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्याच्यासोबत इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन असलेल्याची तपासणी करण्यात आली आहे. या चालकाने ज्या गर्भवतीला सावंतवाडी आणले. तिच्यासोबत आलेल्यांपैकी कोणी संसर्गित होते का, याचाही शोध घेण्यात येत आहे.








