न्यूयॉर्क
ब्रह्मांडातील आकाशगंगेतून निघणारा प्रकाश आता आवाजाच्या रुपात ऐकून समजून घेतला जाऊ शकतो. आकाशगंगेत जितका प्रकाश होईल, तितकाच ध्वनी मधील उतार-चढाव वाढत जाणार आहे. प्रकाश कमी झाल्यास ध्वनीमधील उतार-चढाव घटणार असून याला सोनिफिकेशन म्हटले जाते. डाटाला ध्वनीत रुपांतरित करण्याची ही प्रक्रिया असून नासाने या प्रकल्पास प्रारंभ केला आहे. या प्रकल्पाच्या मदतीने पहिल्यांदाच आकाशगंगेला सर्वसामान्य ऐकू शकणार आहेत.
नासाने ट्विटरवर चित्रफित प्रसारित केली आहे. चित्रफितीत आकाशगंगेच्या छायाचित्रांवर ध्वनी डाव्याकडून उजव्या दिशेने सरकतो. ध्वनीतून कुठे किती प्रकाश आहे हे समजून येते. अधिक प्रकाश असलेल्या ठिकाणी पोहोचताच त्याच्या ध्वनीत बदल होतो.
नासानुसार वापरकर्ते 400 प्रकाशवर्षे अंतरावरून दिसणाऱया छायाचित्राला ध्वनीच्या स्वरुपात ऐकू शकतात. ही छायाचित्रे एक्स-रे वेधशाळा, हबल दूर्बिण, स्पिट्जर दुर्बिणीद्वारे घेण्यात आली आहेत. आकाशगंगेची विविध छायाचित्रे वेगवेगळय़ा प्रकारचा ध्वनी निर्माण करत आहेत. आकाशगंगा अनेक प्रकारचे वायू, अब्जावधी ग्रहांची सौरमंडळे आणि धुळीने तयार झाली आहेत. आकाशगंगांदरम्यान एक मोठे विवर असून त्याला ब्लॅक होल म्हटले जाते.
ट्विटरवर समाजमाध्यम वापरकर्ते याला अमेझिंग टेक्नॉलॉजी ठरवत आहेत. हे छायाचित्र एका छोटय़ा म्युझिक बॉक्समध्ये रुपांतरित होत असल्याचे एका वापरकर्त्याने नमूद केले आहे. तर हा विज्ञान आणि कलेचे स्वर्गातील मिलन असल्याची टिप्पणी अन्य एका वापरकर्त्याने केली आहे.