दत्तक गाव उपक्रमांतर्गत आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
कणकुंबी भागातील दाट जंगलात वसलेल्या खेडय़ांतून गाव दत्तक उपक्रमांतर्गत लोककल्प फौंडेशन व लोकमान्य सोसायटीच्यावतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लोककल्प फौंडेशनच्यावतीने दारोळी गावात सामान्य आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात 100 ग्रामस्थांची उपस्थिती होती.
जांबोटी येथील डॉ. कविता पांडुरंग अजेतराव यांनी ग्रामस्थांची तपासणी केली. ग्रामस्थांच्या सामान्य आरोग्याची माहिती देणे हा शिबिराचा उद्देश होता. अपोलो फार्मसी बेळगावच्यावतीने रक्तदाब व रक्तातील साखरेची चाचणीही करण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराबद्दल ग्रामस्थांना खूप आनंद झाला आणि त्यांनी डॉक्टरांचे तसेच लोककल्प फौंडेशनचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, अशी शिबिरे यापूर्वी आयोजित केली गेली नव्हती आणि जरी ती आयोजित केली गेली तरी कोणीही त्यांना त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगितले नव्हते. त्यामुळे कित्येक आजारांबद्दल जनजागृती झाली नाही.
लोककल्प फौंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्मयातील आंबोळी गावातही डॉ. कविता पांडुरंग अजेतराव यांनी ग्रामस्थांची तपासणी केली आणि सामान्य आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. रोगप्रतिकारक औषध, मल्टिव्हिटॅमिन व इतर मूलभूत औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
डॉक्टरांनी मोसमी फ्लू, सर्दी, खोकला, कुपोषण, अशक्तपणा आदी रुग्णांचे निदान करून औषधे दिली. डॉ. किरण चव्हाण आणि डॉ. दिनेश नाकाडी यांनी शुगर तपासणी व बीपी चाचणी केली. या कार्यक्रमासाठी लोककल्प स्वयंसेवक संतोष कदम आणि सुहासिनी पेडणेकर, कर्मचारी आणि मालिनी बाली आदी उपस्थित होते.









