अधिकारी, चालक थोडक्यात बचावले
वार्ताहर / आंबोली:
आंबोली घाटात पूर्वीचा वस देवस्थाननजीकच्या ‘चाळीस फुटा’च्या नामक मोरीजवळ वन विभागाच्या चालत्या वाहनावरच दरड कोसळली. वाहनातील अधिकारी आणि चालक सुदैवानेच बचावले. वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सदर घटना समजताच आंबोलीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, सहकारी गजानन देसाई आणि मायकल डिसोजा यांनी घटनास्थळी जाऊन थोडी दरड बाजूला करून घाटातून एकेरी वाहतूक सुरू केली. आंबोली घाटात दरवर्षी उन्हाळा आणि पावसाळी हंगामात या चाळीस फुटाजवळील धोकादायक दरडींचा भाग रस्त्यावर पडत असतो. शुक्रवारी सकाळी आंबोली वनविभागाची गाडी सावंतवाडीच्या दिशेने जाताना या गाडीवरच ही दरड कोसळली. गाडीमध्ये आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव आणि त्यांचे चालक होते. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक बांधकाम अधिकारी याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. घाटात अजूनही धोकादायक दरडींचा भाग शिल्लक असून तो कधी पडेल, ते सांगता येत नाही. घाटातील धोकादायक दरडी लवकरात लवकर पाडून वाहन चालकांना भयमुक्त करा, अशी मागणी वाहन चालक तसेच आंबोली ग्रामस्थांमधून होत आहे.









