डोक्यामागे जखमेची खूण, प्रथमदर्शनी घातपाताची शक्यता
वार्ताहर / आंबोली:
आंबोली घाटात मुख्य दरडीच्या खालील बाजूला 20 फूट खोल दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सोमवारी आढळला. महिलेच्या डोक्याच्या मागील बाजूला जखमेची खूण असल्याने घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेची खबर हवालदार दत्तात्रय देसाई यांनी दिली. आंबोली रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. इस्लामपूर येथील जागरुक युवकांमुळे मृतदेहाची माहिती मिळाली. एनडीएची परीक्षा देऊन सदर युवक चालले होते. गतवर्षी घाटात असाच एका परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळला होता. मात्र, तिची ओळख अजूनही पटलेली नाही.
इस्लामपूर येथील युवकांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्राला दिलेल्या माहितीनुसार गोव्यात पणजी येथे एनडीएची परीक्षा देणारा एकजण तेथील आपल्या मित्रासह इस्लामपूरला गावी जायला निघाले. घाटात ते फोटो काढण्यासाठी थांबले होते. आपल्या ताब्यातील मोटारसायकल त्यांनी रस्त्याकडेला पार्क करून ते घाटातील धबधब्याजवळ फोटो काढत होते. एकजण घाटातील दरी न्याहाळत होता. त्यावेळी संरक्षक कठडय़ाखालील बाजूला पांढऱया रंगाची लेगीन्स दिसली. त्यामुळे त्यांनी खाली खात्री केल्यावर एका महिलेचा मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले . त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात खबर दिली.
आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दत्तात्रय देसाई यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांना माहिती दिली. सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, स्वाती यादव, पोलीस उपनिरीक्षक जयराज पाटील, पोलीस नाईक प्रकाश कदम, गजानन देसाई, जगदीश दुधवडकर, संदीप गावडे, जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार विलास नर, आंबोली पोलीस पाटील विद्या चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आंबोली रेस्क्यू टीमचे दीपक मेस्त्राr, राकेश अमृसकर, गजानन देसाई यांनी दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मदतीसाठी आंबोलीतील ग्रामस्थ बाबली राऊळ, बाळू गावडे, सुमित राऊत, संतोष पालेकर, विष्णू चव्हाण उपस्थित होते.
चार-पाच दिवसांपूर्वीची घटना
मृत महिलेच्या अंगावर हिरवा टॉप, ऑफव्हाईट लेगीन्स, डाव्या पायात काळय़ा-पांढऱया मण्यांची पैंजण आहे. महिलेची उंची पाच फूट असून रंग गोरा आहे. तिच्या डोक्याच्या मागील बाजूला मारल्याची खूण असून चेहरा कुजलेला आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे मुश्कील आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मळगाव-सावंतवाडी येथून एक महिला चार दिवसांपासून बेपत्ता असून त्यासंदर्भातही चौकशी करण्यात येणार आहे.
ठसेतज्ञांकडून पाहणी
ओरोस जिल्हा पोलीस मुख्यालयातील श्वानपथक तसेच ठसेतज्ञांनी दरीत उतरून पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला. मृतदेह तपासणीसाठी सावंतवाडी कुटिर रुग्णालयात पाठविण्यात आला.









