दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांची गैरसोय : दुरुस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेवाडी-कडोली या तीन किलो मीटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालविण्याची वेळ आली आहे. संबंधित खात्याचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरातील वाहनधारकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. शेतवडीतून रस्ता गेल्याने शेतकऱयांचीदेखील वर्दळ असते. परिसरात खडीमशीन असल्याने अवजड वाहनांची सतत ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा होऊन वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात घडत आहेत. या खड्डय़ांतून पाणी साचत असल्याने डबक्मयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा मार्गावरूनच वाहनधारकांना जीव धोक्मयात घालून मार्गस्थ व्हावे लागत आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊनदेखील याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.
आंबेवाडीसह परिसरातील मण्णूर, गोजगा, उचगाव, हिंडलगा, सुळगा या गावातील नागरिकांना कडोली भागात जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर व कमी अंतराचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी कूचकामी ठरला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कडोली भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागत
आहे.
खडीमशीनच्या डंपरनेच रस्त्याची दुर्दशा
परिसरात असलेल्या खडीमशीनच्या डंपरमुळेच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परिसरात दोन खडीमशीन आहेत. या खडीमशीनचे डंपर या मार्गावरूनच ये-जा करतात. शिवाय या अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोका टाळण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून परिसरातील वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









