महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावर महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात आज भली मोठी दरड कोसळली. यामुळे महाबळेश्वरमार्गे कोकणात जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम हाती घेतले आहे. सायंकाळी सहा वाजता एकेरी वाहतूक सुरू करण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला यश आले.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गेली तीन दिवस येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज वादळी वाऱ्याचा वेग मंदावला असला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी येथे कोसळत आहेत. मुसळधार पावसाने महाबळेश्वर पासून ७ कि.मी. अंतरावर मेटतळे गावच्या हद्दीत दुपारी साडेचार वाजता आंबेनळी घाटात भली मोठी दरड कोसळली. दरड कोसल्यामुळे महाबळेश्वर पोलादपुर वाहतूक ठप्प झाली, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी तातडीने जेसीबी सह मजूर व कर्मचारी यांचे पथक जेसिबीसह घटनास्थळी रवाना केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ऐस डी धुमाळ , जेधे , केलगणे हे तातडीने घटना स्थळी रवाना झाले. दरम्यान घाटातील वाहतूक माहाड नाक्यावर रोखून धरण्यात आली. या ठिकाणी वाहनांची रांग लागल्या होती. सायंकाळी ६ वा रस्त्यातील काही भागातील दरड हटविण्यात आली व तेथून एकरेत वाहतूक सुरू करण्यात आली.









