कराड / प्रतिनिधी :
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात शेतकरी हितासाठी कराड येथे आंदोलन केले असता शेट्टी, खोत यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होते. कराडच्या न्यायालयाने या खटल्यातून माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मुक्तता केली आहे. माजी मंत्री खोत यांनी शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत दोषमुक्त झाल्याची माहिती दिली असून, एकूण 47 केसेसमधून दोषमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
खोत यांनी यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकेची झोड उठवली. खोत म्हणाले, सन 2012 आणि 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरवाढीसाठी आक्रमक झाली होती. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व करत सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकूण 47 गुन्हे दाखल करण्यात आल्या होते. त्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल होऊन कराड न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्या सर्व 47 केस निकाली निघाल्या असून, त्यात माझी निर्दोष मुक्तता झाली आहे, अशी माहिती खोत यांनी दिली.
आमच्यावर घटले दाखल झाले तेव्हा महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावचव्हाण साहेबांच्या कर्मभुमीतील पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले होईल, अशाअपेक्षा होत्या. मात्र त्यानी या सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या. एखादा सभ्यव्यक्तीसुद्धा राजकारणाच्या पटलावर सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे हे आहे, असा आरोपही खोत यांनी केला.









