मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आयोजित करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव हे पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या धर्तीवरच हा महोत्सवही एक उत्कृष्ट सोहळा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वन खात्यातर्फे आयोजित वन्यजीव सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. आल्तिनो येथील वन खात्याच्या इमारतीत आयोजित या सोहळ्यास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात वनौषधी लागवडीस जास्त प्रोत्साहन देणे आवश्यक असून दुर्मिळातील दुर्मिळ प्रजाती शोधून त्यांची लागवड करण्यावर भर दिल्यास भविष्यात त्या दृष्टीनेही गोव्यास एक वेगळी ओळख प्राप्त होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
इको टुरिजम, दुर्गम पर्यटन, धबधबे ही आपली ओळख होती. यापुढे त्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. भविष्यात वने हीच आमची शक्ती असणार आहे. त्यांचे रक्षण आणि संरक्षण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन अधिकाऱयांना केले. वनसंरक्षणासाठी अविरत कार्यरत राहणाऱया अधिकाऱयांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रारंभी वनखात्याचे प्रधान मुख्य संरक्षक सुभाष चंद्र यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. वनखात्याच्या कर्मचाऱयांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बावटा दाखवून वॉकेथॉन रॅलिचे उद्घाटन केले. वन्यजीव प्रमुख वार्डन संतोष कुमार यांनी स्वागतपर भाषण केले. प्रधान वनसचिव पुनित गोयल यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी वनखात्यातर्फे निर्मित खास वन्यजीव संबंधी माहितीपट दाखविण्यात आला.
खात्यात गौरवपूर्ण कामगिरी बजावणाऱया अली शेख (फोंडा), दीपक हंसकर (खोतीगाव), रॉकी (केपे), राजन हळर्णकर (मोरजी) आणि अर्जून गावस (बोंडला) या वनकर्मचाऱयांचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनाही यावेळी सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. सौरव कुमार यांनी आभारप्रदर्शन केले.









