ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोना आणि ओमिक्रॉन बाधितांमध्ये होणारी वाढ विचारात घेऊन केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. बाधितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी चोवीस तास कोरोना तपासणी आणि चाचणी केंद्रे सुरू ठेवण्याचा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. देशात शुक्रवारी एका दिवसात तब्बल १६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिले आहे. ओमिक्रॉनचे संकट लक्षात घेता राज्यांनी आयसोलेशन बेड्स, अॅम्ब्युलन्सची संख्या, औषधांची उपलब्धता तसेच मनुष्य बळ वाढवण्याच्या सूचना त्यांनी या पत्रातून दिल्या आहेत.
सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच युरोप, अमेरिकासारख्या विकसित देशांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता भारतात खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं या पत्रात नमूद करण्यात आलेय. याशिवाय ताण झेलणारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करा, अस्थायी रुग्णालयांची निर्मिती करा, यासाठी सीएसआयआर, डीआरडीओ, प्रायव्हेट सेक्टर आणि एनजीओंची मदत घ्या असंही या पत्रात म्हटले आहे.
ज्या ज्या ठिकाणी लोक होम क्वारंटाईन आहेत त्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करा, रुग्णांच्या मदतीसाठी कॉल सेंटर, कंट्रोल रुम सज्ज ठेवा, सोबतचं लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी अॅम्ब्युलन्सची सुविधा ठेवा असे निर्देश दिले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यांनी चाचण्यांची संख्या वाढवावी. यात आरटीपीसीआर तसेच रॅपिड आणि अॅन्टिजेन टेस्ट करण्यावर भर द्यावा असंही केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.