अहमदाबाद : देशात कोरोना संकटामुळे अनेक प्रकारचे निर्बंध लागू आहेत. धार्मिक सोहळय़ांना मनाई करण्यात आली आहे. पण कोरानाशी संबंधित दिशानिर्देश मानण्याच्या अटीवर काही प्रमाणात सूट दिली जात आहे. याचदरम्यान गुजरात सरकारने अहमदाबाद येथील भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला मंजुरी दिली आहे. कोरोना विषयक दिशानिर्देशांचे पालन करत ही रथयात्रा काढता येणार आहे.
भगवान जगन्नाथाची रथयात्रा निघणाऱया मार्गावर संचारबंदी राहणार आहे. रथ ओढणाऱया लोकांना 48 तासांच्या कालावधीतील आरटी-पीसीआर अहवाल प्रशासनाला दाखवावा लागणार आहे. गजराज (हत्ती), ट्रक, भजन मंडळे यांना सामील होता येणार नाही. तसेच लोकांना कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पूर्ण पालन करावे लागणार आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे रथयात्रेचे आयोजन होऊ शकले नव्हते.
पण यंदा अहमदाबाद प्रशासनाने रथयात्रेला मंजुरी दिली आहे. रथयात्रेत अखाडे, हत्ती, चित्ररथ आणि भजन मंडळांना सामील होता येणार नाही. शहरातील मंदिरात रथयात्रेची तयारी केली जात आहे.
भगवान जगन्नाथ रथयात्रा 12 जुलै रोजी आयोजित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओडिशात केवळ पुरी शहरापुरती मर्यादित रथयात्रा निघणार आहे. न्यायालयाने कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट आणि तिसऱया लाटेची भीती पाहता ओडिशा सरकारच्या निर्णयाला योग्य ठरवत अन्यत्र रथयात्रेच्या आयोजनावर बंदी घातली आहे. न्यायालयाने मंगळवारी पूर्ण राज्यात रथयात्रा काढण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती.