सार्वजनिक किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडे टक लावून पहात राहणे, त्यांना अनुचित उद्देशाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकार चालतात. हे भारतातच होते असे नाही तर ब्रिटनसारख्या देशामध्येही घडत असते. याला वैतागलेल्या महिलांपैकी काही तक्रार सादर करण्याचे धाडस दाखवितात.
ब्रिटनमध्ये एका महिलेने टॉबी एडिसन नामक एका युवकाविरोधात अशीच तक्रार सादर केली. हा युवक आपल्याकडे सारखा टक लावून पहात असतो. त्यामुळे आपल्यावर दडपण येते आणि भीती वाटते, असे तिचे म्हणणे होते. हा युवक व्यायामासाठी व्यायामशाळेत गेला असताना तिथे ही महिलाही व्यायाम करत होती. ती व्यायाम करत असताना तो तिच्याकडे टक लावून पहात होता, अशी तक्रार तिने व्यायामशाळेच्या व्यवस्थापनाकडे केलेली होती. तथापि, हा युवक अंध होता हे नंतर स्पष्ट झाले. तो सरावाने मार्गांवरुन चालण्यास शिकला होता आणि तशा प्रकारे तो व्यायामशाळेत नेहमी येत असे. आपण अंध आहोत. त्यामुळे आपले डोळे कोणाकडे रोखले गेलेले असतात हे आपल्यालाच कळत नाही, ही वस्तुस्थिती सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. तथापि, व्यवस्थापनाने त्याचे व्यायामशाळेत येणे बंद करुन टाकले. त्यामुळे त्याने ही घटना सोशल मिडियावर पोस्ट केली. अंध व्यक्ती एखाद्या महिलेकडे टक लावून ‘पाहू’ शकतो का, या मुद्द्यावर आता चर्चा होत आहे. कायदेतज्ञांच्या मते या युवकावर गुन्हा सादर केला जाऊ शकत नाही. कारण, तो अंध असल्याने त्याचे त्याच्या बुबुळांवर नियंत्रण राहू शकत नाही.









