प्रतिनिधी / लोणंद :
अवैध दारु वाहतूक आणि विक्री करणारी 5 जणांची टोळी लोणंद पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून ओमनी गाडीसह दारुच्या बाटल्या, मोबाईल असा 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, स्वातंत्र्यदिनानिमित्त ड्रायडे असल्याचा फायदा घेऊन अहिरे (ता. खंडाळा) येथील अवैध दारु विक्री करणारी टोळी ओमनी गाडीतुन लोणंद हद्दीत चोरटी दारुची वाहतुक करणार असल्याची तसेच पाडळी (ता. खंडाळा) येथे दोन ठिकाणी अवैध दारु विक्री चालु असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लोणंद पोलीस ठाण्याच्या दोन टिम तयार करुन संबंधित टोळीला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार लोणंद पोलिसांच्या एक टिमने कराडवाडी येथील लोणंद ते शिरवळ जाणारे रोडवर सापळा लावला तेव्हा पोलिसांना पाहुन एक ओमनी गाडी भरधाव वेगात जात होती. लोणंद पोलिसांनी पाठलाग करुन ती कार थांबवुन गाडीची तपासणी केली असता गाडीतील तीन इसमांकडुन 9,000 रु किमतीच्या 300 देशी दारुच्या बाटल्या, 60,000 रु किमतीची ओमनी कार, रोख रक्कम 25700 रुपये व 1,40,000 रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकुण 2,34,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच लोणंद पोलिसांच्या दुसऱ्या टिमने पाडळी (ता. खंडाळा) येथे अवैध दारु विक्री करण्याऱ्या दोन अड्डय़ांवर छापा टाकुन एकुण 1500/- रु. किमतीची देशी दारु जप्त केली असून, लोणंद पोलिसांनी एकुण तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करुन अवैध दारु वाहतुक व विक्री करण्याऱ्या पाच आरोपींच्या टोळीला जेरबंद केले आहे.









