गोडोली / प्रतिनिधी
लिज संपले तरी नागेवाडी डोंगरावर गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले आहे. यातून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या खाण, क्रशर मालकांवर मोक्कातंर्गत कारवाई करा, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रिपाई ए चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
नागेवाडीसह जिल्हामध्ये अनेक ठिकाणी लिज संपले तरीही अवैध खाणीत उत्खनन होत आहे. खनिजाचे बेसुमार उत्खनन झाल्याने शासनाच्या कोट्यावधीचा महसूल बुडवला आहे. सातारा तालूक्यात ९ आणि इतर नवीन ७ अशा उत्खननाच्या परवानगी असताना तब्बल ५८ अवैध खाणी उत्खनन करत आहेत. खटाव तालूक्यात ५ परवाने असताना २५ अवैध खाणी सुरू आहेत. असेच प्रत्येक तालुक्यात उत्खनन होत आहे. याची चौकशी करून तत्काळ अवैध उत्खनन बंद करा, असे निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.
शासनाला गौण खनिज महसूल हा मुख्य उत्पन्नाचा श्रोत आहे. नागेवाडीच्या खाणी या महामार्गालगतच असून ब्लास्टींग आवाजाचे प्रदूषण, धुळीचा बदोबस्त न करता नियमांचे उल्लंघन होते. तरीही महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण विभागाकडून ही दुर्लक्ष करतात. जिल्हयामध्ये अनेक बेकायदेशीर खाणीतून उत्खनन करणाऱ्या सम्राटांवर गुन्हे दाखल करा. यात दोषी महसूल अधिकाऱ्यांनचे निलंबन करा. अन्यथा रिपाई ए च्यावतीने ६ डिसेंबर रोजी निषेध आंदोलन करणार असल्याचा इशारा दादासाहेब ओव्हाळे यांनी दिला आहे.