अध्याय नववा
अवधुतांचे या अध्यायातील गुरु आपण संक्षेपाने बघत आहोत. टिटवी, कुमारी, बालक आणि शरकर्ता लोहार यांना अवधुतानी गुरु का केले ते आपण समजून घेतले. अवधुतांनी सर्पाला पुढील गुरु केले.
सर्पाला कोणाची सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखाने फिरत असतो. तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छ्?वासही व्यर्थ दवडत नाही.
योग्यानेही तसेच करावे. दुसऱयाचा उपसर्ग होऊ देऊ नये. लोकांच्या दृष्टीस न पडेल अशा ठिकाणी तो एकांतात एकटेच रहावे. वाईटाची संगत धरू नये तसेच चांगल्याचीही संगत करू नये. सर्पाने कात टाकल्याप्रमाणे देहाची साथ सोडून बाहेर पडावे. बुद्धीमध्ये निरंतर सावधानता ठेवून एक क्षणही फुकट जाऊ देऊ नये. आपले स्वरूपानुसंधान कधीही तुटू देऊ नये. सर्पाला बोलता येत नाही तो काही थोडासा शब्द मात्र करतो त्याप्रमाणेच योगीही वादविवादामध्ये वा जास्त बोलण्याच्या फंदात कधी पडत नाही. बोललाच तर अंतःकरणातील कृपेच्या बळाने थोडेसे पण मृदु, मंजुळ आणि कोमल असेच बोलतो. त्यामुळे त्याचे भाषण एक वेळ ऐकले तरी कान अगदी तृप्त होऊन जातात. ईश्वराने सृष्टी कशी रचली, कोणापासून उत्पन्न झाली आणि ती योग्याला अभ्यासासाठी पूरक कशी आहे हे मी कोळय़ाकडून शिकलो. म्हणून अवधुतानी कोळय़ाला तेविसावा गुरु केले. कोळी मनात आलं की, आपल्या पोटातून तंतू काढून जाळय़ाची निर्मिती करतो, त्यावर खेळतो आणि मनात आलं की पुन्हा तो तंतू पोटात ओढून घेतो. त्यावरून सृष्टीनिर्मितीचं, पालनाचं व संहार करण्याचं कार्यही असंच चालत असणार असं अनुमान अवधुतानी काढलं. ईश्वर हा सृष्टीचा कर्ता धरता असून ब्रह्मादिक, वायू, समुद्र सूर्य त्याच्या नियंत्रणात कार्य करतात. ईश्वर स्वतः निराधार असून साऱया विश्वाला आधार देत असतो. ईश्वराच्या मनात आहे तोपर्यंत सृष्टीलीला चालू असते. त्याच्या मनात आलं की, मायेने आकारास आणलेली सर्व सृष्टी एका क्षणात गिळून टाकून परमात्मा एकटा उरतो. ही सर्व सृष्टीनिर्मिती प्रत्यक्षात कुणीही पाहिलेली नाही पण कोळी स्वतःच्या तंतूने जाळे तयार करतो व मनात आले की नष्ट करतो हे जेव्हा अवधुतानी पाहिले तेव्हा त्यांना ईश्वराच्या सृष्टीनिर्मितीचे अनुमान लावता आले. कोळीकीटक आपल्या हृदयातून तोंडाद्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो. त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतो. जीवरूपाने त्यामध्ये विहार करतो आणि मनात आले की, ते आपल्यातच लीन करून घेतो. विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे हे कोळय़ाच्या जाळय़ाच्या दृष्टान्ताने अवधुतानी स्पष्ट केले. अवधुताना योगी ईश्वरासारखा कसा व कधी होत असेल याची उत्सुकता होती. कुंभार माशीकडे पाहिल्यावर त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. म्हणून त्यांनी कुंभारणीला चोविसावा गुरु केले. भिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशी ती एक आळी धरून आणते, आणि तिला एका भिंतीवर बांधलेल्या घरटय़ात कोंडून ठेवते. त्यामुळे ती मरणाच्या भयाने त्या कुंभारणीचाच रात्रंदिवस ध्यास करीत राहते. त्या तिच्या तीव्र ध्यानानेच ती आळी स्वतः कुंभारीण बनते आणि तत्काळ आकाशात उडून जाते, हे आपण प्रत्यक्ष डोळय़ांनी पाहतो. बघायला गेलं तर कुंभारीण ही क्षुद्रकीटक तिचे ध्यान करणारी आळीही जडमूड पण तिलासुद्धा तीव्र ध्यानाने कुंभारणीचे स्वरूप प्राप्त होते.
भगवंताच्या ध्यानात, ध्यान करणारा मूळचा भगवद्ªपच असतो. ध्यानाने ‘मी देही’ हा त्याचा भ्रम तेवढा नाहीसा होतो. त्यामुळे तो अनायासेच तद्ªप होतो. याच देहात आणि याच वृत्तीने आपली मुक्ती ज्याला कळत नाही आणि भगवत्पदप्राप्ती करून घेववत नाही, त्याची नरदेहातील विद्वत्ता व्यर्थ होय. तो जर चैतन्यघन होणार नसेल तर त्याचे ज्ञान, ध्यान, यजन, याजन आणि धर्माचरण सारे व्यर्थ होय. अशा प्रकारे चोवीस प्रमुख गुरुंकडून अवधुतानी जे ज्ञान घेतले ते आपण समजून घेतले. आता, ते शरीराकडून काय शिकले ते आपण पुढील भागापासून पाहू …







