मनोज पवार/ दापोली
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्व जीवसृष्टीबरोबर कासवांच्या विणीच्या हंगामालाही फटका बसला आहे. अवकाळीमुळे हवामानात झालेल्या वेगवान बदलामुळे कासवांच्या विणीचा हंगाम पुढे गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यामुळे दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात होणारे कासव महोत्सवही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दापोली व मंडणगड तालुक्यातील आंजर्ले, केळशी, कर्दे, मुरुड, दाभोळ, कोळथरे लाडघर व वेळास आदी समुद्रकिनाऱयांवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या माद्या मोठय़ा प्रमाणात अंडी घालायला येतात. गेल्यावर्षी या सर्व समुद्रकिनाऱयांवर तब्बल 185 कासवांची घरटी व त्यातील 19 हजार 743 अंडी संरक्षित करण्यात आली होती. यातून 7 हजार 812 एवढी विक्रमी संख्येने कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली. हा आकडा 2019-2020 त्या तुलनेत (केवळ 3 हजार 300) दुपटीपेक्षा अधिक आहे.
यंदा निसर्गात झालेल्या बदलामुळे व पूर्व किनाऱयाला वारंवार कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे येथील वातावरणात कमालीचा चढ-उतार पाहायला मिळाला. याचा परिणाम समुद्रातील सागरी जीवांवरही झाला. साधारण नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या माद्या दापोली व मंडणगड हद्दीतील समुद्रकिनाऱयांवर येऊन अंडी घालतात. मात्र यंदा डिसेंबर महिना उजाडला तरी एकही कासव अंडी घालण्यासाठी आलेली नाही. ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. यामुळे दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात होणारे कासव महोत्सवही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
वातावरणात झालेल्या बदलामुळे समुद्र कासवाच्या माद्या अंडी घालण्यासाठी अद्याप किनाऱयावर आलेल्या नसल्या तरी वनविभागाने मात्र आपली जय्यत तयारी केली आहे. वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी व्ही. एस. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडल वन अधिकारी एस. एस. सावंत, वनरक्षक जी. एम. जळणे, शुभांगी गुरव आदी यासाठी प्रयत्न करत आहेत. वनविभागाने दापोली तालुक्यातील दाभोळ येथे 2, कोळथरे येथे 2, लाडघर येथे 1, कर्दे येथे 1, मुरुड येथे 2, केळशी येथे 2 व आंजर्ले येथे 2 कासवमित्रांची नेमणूक केली आहे. हॅचरी उभारल्या आहेत. कासवमित्र समुद्रकिनारी सायंकाळी, रात्री व पहाटे गस्त घालत आहेत. मात्र त्यांना अद्याप कासवाचे एकही घरटे आढळलेले नाही. यामुळे कासव महोत्सवावर अवलंबून असणारे दापोली समुद्रकिनाऱयांवरील काही गावांचे अर्थकारण डबघाईस आले आहे.
अनेक व्यवसायांवर परिणाम शक्य
कासवाची पिल्ले अंडय़ातून बाहेर येण्याच्या वेळी वनविभागातर्फे अनेक समुद्रकिनाऱयांवर कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. अंडय़ातून बाहेर पडणारी कासवाची पिल्ले सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर समुद्रात सोडण्यात येतात. हा क्षण टिपण्यासाठी देशभरातून निसर्गप्रेमी दापोलीत येतात. यामुळे दापोलीत पर्यटनाला चालना मिळते. त्यातून पर्यटनावर अवलंबून असणाऱया व्यावसायिकांनाही चांगला आर्थिक लाभ होतो. मात्र यंदा कासव महोत्सवाला अवकाळीचा फटका बसल्याने पर्यटनावर अवलंबून क्षेत्रांतूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
वाळूमाफियांचाही परिणाम
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी सागरी कासवांच्या माद्या मोठय़ा प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून आंजर्ले समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळूचे उत्खनन होत आहे. यामुळे समुद्रकिनाऱयावरील नैसर्गिक अधिवास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याचाही कासवे समुद्रकिनाऱयावर न येण्याच्या घटनेला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.









